दरम्यान, आजच संसदेत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की एनआरसी प्रकल्प आसाममध्ये सुरु करण्यात आला होता. त्यांचे चांगले परिणाम समोर आल्यामुळे येत्या काळात हा प्रकल्प संपूर्ण देशभरात राबवला जाणार आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे वित्तमंत्री हिमंता बिस्वा शर्मा या दोघांनी एनआरसीबाबत दोन वेगवेगळी वक्तव्ये केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शर्मा यांनी एनआरसीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, एनआरसीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आहेत. तसेच अनेक त्रुटी येत्या काळात समोर येतील. एनआरसी प्रकल्प ज्या उद्देशाने सुरु केला होता. तो साध्य होण्याच्या सर्व अपेक्षा मी सोडून दिल्या आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकार घुसखोरांना राज्यातून बाहेर काढण्यात वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करत आहे.
एनआरसीमधील अनेक त्रुटी आम्ही समोर आणल्या आहेत. तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. आसाममधील सध्याचा एनआरसी प्रकल्प रद्द करावा, तसेच आसाममध्ये राष्ट्रीय एनआरसी प्रकल्प सुरु करुन नागरिक आणि घुसखोरांची माहिती मिळवावी, अशी मागणीदेखील शर्मा यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, शर्मा यांची मागणी मान्य झाली आहे, असे म्हणता येईल. कारण आज राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, एनआरसी प्रकल्प आता संपूर्ण देशभरात सुरु होईल. त्यामध्ये आसामचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आसाम हे राज्यदेखील राष्ट्रीय एनआरसीचा भाग असेल.