नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहेत. परंतु सत्तास्थापनेला कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडून हिरवा कंदील मिळाला नव्हता, त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कायम होता. परंतु हा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे, कारण कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाशिवआघाडीला मंजुरी दिली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

सोनिया गांधींकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता केवळ सत्तेचं वाटप, मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापन होईल. शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सकाळी दावा केला होता की, पुढील एक आठवड्यात राज्यात सत्तास्थापन होईल. त्यांचा हा दावा खरा ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोड्याच वेळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार आहे. परंतु त्याअगोदर काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात सोनिया गांधींशी चर्चा झाली. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधींनी महाशिवआघाडीला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे बोलले जात आहे.

थोड्याच वेळात 06 जनपथ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाशिवआघाडीबाबतची पुढील चर्चा होईल. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, आमदार अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित असतील. तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान हे सहा नेते उपस्थित असतील तर

आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादीची आज होणारी बैठक (महाशिवआघाडीबाबतची चर्चा करण्यासाठीची बैठक) ही शेवटची असेल. या बैठकीनंतर राज्यातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असा अंदाजही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता.

पाहा काय म्हणाले होते संजय राऊत?



व्हिडीओ पाहा : दोन ते तीन दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार