धक्कादायक म्हणजे, काँग्रेसच्या मित्राचा म्हणून जो क्रमांक देण्यात आलाय, तो क्रमांक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा असल्याचा आरोपही संबित पात्रा यांनी केला आहे.
तसेच, काँग्रेस सत्तेत असताना गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या काहींची नक्षलवाद्यांना सहानुभूती असल्याचा दावाही संबित पात्रा यांनी केला आहे.
पात्रा यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या महेश राऊतला यूपीए सरकारच्या काळातही अटक झाली होती. मात्र, त्यावेळी जयराम रमेश यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून राऊत सज्जन व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं, असा आरोप पात्रा यांनी केलाय.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांनी नेमके काय दावे केलेत?
“काँग्रेस पक्षात असे काहीजण आहेत, ज्यांची नक्षलवादाला सहानुभूती आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, काँग्रेसची राष्ट्रीय सल्लागार समिती नक्षलवादाचं समर्थन करते.”, असा दावा संबित पात्रा यांनी केला आहे.
तसेच, “काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणांनी टाकलेल्या छाप्यात कॉम्रेड सुरेंद्र आणि कॉम्रेड प्रकाश यांचं 25 सप्टेंबर 2017 रोजीचं पत्र सापडलं. ‘या प्रक्रियेत काँग्रेस नेते आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. आंदोलनांसाठी निधी देण्यासाठीही ते तयार आहेत.’ असे त्या पत्रात म्हटलं आहे.” असा दावाही संबित पात्रांनी केला आहे.
या पत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा नंबरही आढळला असल्याचा दावाही पात्रांनी केला आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण
“आधी देशद्रोही आणि आता नक्षलीचा आरोप. मात्र या नंबरशी माझा काहीही संबंध नाही. माझा नंबर अनेकांजवळ आहे, बाकी सरकारचा निर्णय असेल, सरकारला वाटत असेल, तर त्यांनी मला अटक करावी.”, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दिले आहे.