नवी दिल्ली : ऑलिम्पिक म्हटल्यावर आपल्याला पटकन खेळांचं ऑलिम्पिक आठवतं. पण देशभरातल्या नाटयसंस्कृतींचा आविष्कार घडवणारं थिएटर ऑलिम्पिक्स यंदा भारतात भरतं आहे. 1993 सालापासून सुरु झालेल्या या परंपरेचं यजमानपद भूषवण्याची संधी यंदा भारताला मिळाली आहे.

17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल असा जवळपास दीड महिन्यांचा हा सांस्कृतिक कुंभमेळा भरणार आहे. देशात प्रथमच भरल्या जाणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची धूम दिल्लीत सुरु झाली आहे.

एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या परिसरात सध्या एक वेगळीच लगीनघाई सुरु आहे. थिएटर ऑलिम्पिक्ससाठी नाट्यक्षेत्रातले आंतरराष्ट्रीय दिग्गज भारतात येणार असून या वैश्विक महोत्सवाची लगबग या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्यावरच जाणवते.

1993 मध्ये ग्रीसमध्ये पहिल्या थिएटर ऑलिम्पिकची सुरुवात झाली. त्यानंतर आता हे आठवं ऑलिम्पिक भारतात पार पडणार आहे. जगभरातले 25 हजार हून अधिक कलाकार पुढच्या दीड महिन्यांत या महारंगमंचावर आपली कला सादर करतील. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर 17 फेब्रुवारीला या महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर 8 एप्रिलला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर त्याचा समारोप सोहळा पार पडेल.

नाट्यसंस्कृतीच्या या महाकुंभात महाराष्ट्रही मागे नाही. अनेक मराठी नाट्यकृती या महोत्सवात सादर होणार आहे. शिवाय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गणेशस्तवनही सादर होणार आहे.

रतन थिय्याम, एलेक पद्मसी, सतीश आळेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरच्याही अनेक दिग्गजांना भेटण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. दिल्लीसह मुंबई, बंगळुरु, कोलकाता अशा 17 शहरांमध्ये नाटकांचं सादरीकरण होणार आहे.

भारताच्या संस्कृतीला प्राचीन काळात जी प्रतिष्ठा होती, ती या माध्यमातून पुन्हा दाखवून देण्याचा प्रयत्न होतो आहे. आपल्या चाकोरीपलीकडे जाऊन इतर राज्यांत, इतर देशांत कशापद्धतीचं नाटक रुजतंय हे नाट्यरसिकांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाचा भारतात होणाऱ्या या नाटकांच्या कुंभमेळ्यात तृप्त होण्याची संधी तुम्हीही चुकवू नका.