नवी दिल्ली : आधार कार्ड नसल्यामुळे कुणी लाभापासून वंचित तर राहत नाही ना, याची खात्री करण्याचे आदेश कायदा आणि माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्य सरकारला दिले आहेत. सर्व राज्यांनी याची खात्री करुन द्यावी, असे स्पष्ट आदेश रविशंकर प्रसाद यांनी दिले.


''आधार हे एक मोठं व्यासपीठ आहे. सुशासन आणि बचतीसाठी आधार फायदेशीर आहे. मात्र आधारसाठीही एक कायदा आहे, ज्यात सांगितलंय की आधार नसेल तर लाभापासून कुणालाही वंचित ठेवू नये,'' असं रविशंकर प्रसाद यांनी सर्व राज्यांचे आयटी मंत्री आणि सचिवांना सांगितलं.

''एखाद्या व्यक्तिकडे आधार कार्ड नसेल तर त्याला ते आणायला सांगायला हवं किंवा पर्यायी ओळखपत्राचा वापर केलं जाणं अपेक्षित आहे,'' असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.

अनेकदा वृद्धांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत. अशा वेळी त्यांचा आधार नंबर एका नोंदवहीमध्ये लिहून ठेवावा आणि त्यांना लाभ द्यावा, असे आदेशही रविशंकर प्रसाद यांनी दिले. लाभ घेणं त्यांचा कायदेशीर हक्क आहे आणि त्यासाठी आपण नाकारु शकत नाही, असं ते म्हणाले.