Manipur Unrest: देशाचे ईशान्येकडील राज्य मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. सशस्त्र जमामावकडून गावांवर हल्ले केले जात आहेत, घरे जाळत आहेत, दुकानांची तोडफोड केली जात असल्याने परिस्थिती धगधगती कायम आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी एनआयटी मणिपूरमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून अडचणीत सापडलेल्या या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत.

Continues below advertisement

राज्यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना मदतीची ग्वाही दिली. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एनआयटी मणिपूरमध्ये शिकणारे विद्यार्थी स्थानिक तणावामुळे खूप अस्वस्थ आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर लगेचच मणिपूर सरकारशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली.

सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याची तयारी

यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनीही मणिपूरच्या पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून परिस्थिती सामान्य होईपर्यंत या विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. याशिवाय या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून तत्काळ व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Continues below advertisement

मणिपूर हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू 

मणिपूर हिंसाचारात 54 जणांचा आतापर्यंत मृत्यू  झाला आहे. यापैकी 16 जणांचे मृतदेह चुरचंदपूर येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर 15 मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, इंफाळच्या पश्चिमेकडील लॅम्फेल येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने 23 मृत्यूंना दुजोरा दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या