By Election Result : आज देशातील 3 लोकसभेच्या आणि 7 विधानसभेच्या जागांचा निकाल जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगढ येथे तर पंजाबमधील संगरुर लोकसभा जागेवर पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान झाले होते. तर त्याचवेळी दिल्ली, झारखंड, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकींचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या महत्त्वाच्या जागा मानल्या जात आहेत. या लोकसभेच्या दोन्ही जागांवर चुरशीची लढत झाली होती.
या जागा झाल्या होत्या रिक्त
भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची संगरुरची जागा रिक्त झाली होती. तसेच आझम खान यांनी देखील लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रामपूरची जागा रिक्त झाली होती. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे आझमगडमधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दिल्लीच्या राजेंद्र नगर, झारखंडच्या मंडारी आणि आंध्र प्रदेशच्या आत्मकूर विधानसभेसाठीही मतदान झाले होते. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यामुळे राजेंद्र नगरची जागा रिक्त झाली होती. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चढ्ढा यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
उत्तर प्रदेशमध्ये या उमेदवारांमध्ये स्पर्धा
भाजपच्या वतीनं दिनेश लाल निरहुआ यांना आझमगडमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी रामपूर मतदारसंघातून भाजपने घनश्याम लोधी यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात घनश्याम लोधी समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. समाजवादी पार्टीने आझमगडमधून माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने गुड्डू जमाली यांना उमेदवारी दिली. रामपूर मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर सपाकडून असीम राजा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळं आता या सर्व जागांचा निकाल काय लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.