Piyush Goyal : वस्त्रोद्योगात येत्या काही वर्षांत रोजगार निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे वक्तव्य केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं. ते कोईम्बतूर इथे एका कार्यक्रमात केले. केंद्र सरकार सुती आणि मानवनिर्मित वस्त्रोद्योग या दोन्ही क्षेत्रांना प्रोत्साहन देत आहे. जेणेकरुन जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांचा सहभाग वाढेल. त्यामुळं रोजगाराच्या संधी आणि गुंतवणुक यामध्ये वाढ होईल, असेही गोयल यावेळी म्हणाले. तसेच आपल्याला जागतिक बाजारपेठ काबीज करायची असल्याचे देखील गोयल म्हणाले.  


दक्षिण भारत मिल संघटनेनं (SIMA) कोइम्बतूर येथील कोइम्बतूर जिल्हा लघु उद्योग संघटना (CODISSIA) व्यापारी संकुलात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोयल बोलत होते. आंतरराष्ट्रीय कापड यंत्रसामग्री, सुटे भाग, उपकरणे आणि सेवांचे प्रदर्शन असलेल्या, 13 व्या सीमा टेक्सफेअरचे उद्घाटन  पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. केंद्र सरकार सुती आणि मानवनिर्मित वस्त्रोद्योग या दोन्ही क्षेत्रांना प्रोत्साहन देत असल्याचे गोयल यावेळी म्हणाले. सर्वच क्षेत्रात, आपल्याला जागतिक उद्योग बनायचे आहे. आपल्याला जागतिक बाजारपेठ काबीज करायची असल्याचे ते म्हणाले. यासोबतच, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार अनेक देशांबरोबरच्या मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप देण्यासाठी सक्रियपणे काम करत असल्याने वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत शून्य शुल्क प्रवेश मिळेल असे गोयल यांनी सांगितले.


तरुण आणि महिला उद्योजकांनी विकासासाठी पुढं यावं


दरम्यान, 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात साध्य करण्यासाठी सरकारनं राबवलेले विविध धोरणात्मक उपक्रम आणि उद्योगांनी घेतलेल्या मेहनतीवर गोयल यांनी प्रकाश टाकला. सर्व तरुण आणि महिला उद्योजकांना गुंतवणूक करण्यासाठी आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन देखील गोयल यांनी केले. शेतापासून कापडापर्यंत, कापडापासून तयार उत्पादनांपर्यंत, तयार उत्पादनांपासून फॅशन उत्पादनांपर्यंत आणि शेवटी परदेशी उत्पादनांपर्यंत, संपूर्ण मूल्य शृंखलेत भारताचा मोठा वाटा असल्याचे गोयल यांनी सांगितलं.


कोरोना काळात अनेक देशांना मदत


जेव्हा त्यांनी दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटनेला (SITRA) भेट दिली तेव्हा त्यांनी सॅनिटरी नॅपकिनसाठी उत्पादन सुविधा पाहिली. महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्याला मोदी सरकार प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत तामिळनाडूतील महिलांना परवडणाऱ्या दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जात आहे. गोयल यांनी पीपीई किटचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक बनण्याच्या भारताच्या क्षमतेचा पुनरुच्चार केला. या उत्पादनाने केवळ राष्ट्रातील लोकांचे आणि फ्रंटलाइन कामगारांचे संरक्षण केले एव्हढेच नव्हे तर निर्यातीद्वारे अनेक देशांना देखील मदत केली.


कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी 


केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने राबविलेल्या अनेक धोरणात्मक उपक्रमांची माहिती दिली. कोविड महामारीच्या दुष्परिणामांमुळे संपूर्ण जग गंभीर मंदीच्या गर्तेत सापडले असताना केंद्र सरकारने केलेल्या अनोख्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे देशाने  कोरोनाविरुद्ध यशस्वी  लढा दिल्याचे ते म्हणाले.