PM Modi In Shillong: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयची राजधानी शिलाँग येथे 2450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ईशान्या भारताच्या बाबात आधीच्या सरकारचा हेतू विभाजनकारी होता, असा हल्लाबोल मोदींनी यावेळी केला. ईशान्य भारताच्या बाबतीत आधीच्या सरकारचा दृष्टिकोन “डिव्हाईड’ म्हणजे विभाजनकारी होता, मात्र आमचे सरकार ‘डिव्हाईन’ म्हणजे पवित्र हेतूने काम करत आहे, असे यावेली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या विविध प्रकल्पात, 4-जी मोबाईल टॉवर्स पैकी, 320 पूर्ण झालेल्या आणि 890 बांधकाम सुरु असलेल्या टॉवर्सचे तसेच आयआयएम शिलाँगच्या परिसराचा समावेस आहे. त्याशिवाय, शिलाँग - दियांगपासोह रस्त्याचेही त्यांनी उद्घाटन केले. यामुळे,न्यू शिलॉंग टाऊनशिपला उत्तम कनेक्टिव्हीटी मिळेल. तसेच मेघालय, माणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील तीन राज्य महामार्ग प्रकल्पांचेही त्यांनी उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मशरूम विकास केंद्र आणि मेघालयातील एकात्मिक मधमाशी पालन विकास केंद्रातील स्पॉन प्रयोगशाळेचे आणि मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाममधील 21 हिंदी ग्रंथालयांचे उद्घाटनही केले. आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमधील सहा रस्ते प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. त्यांनी तुरा आणि शिलाँग टेक्नॉलॉजी पार्कच्या दुसऱ्या टप्प्यात, एकात्मिक आदरातिथ्य आणि संमेलन केंद्राची पायाभरणीही केली.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की मेघालय हे समृद्ध राज्य आहे. इथे नैसर्गिक संपत्ती देखील आहे आणि सांस्कृतिक संपत्ती सुद्धा. ही समृद्धी मेघालयच्या लोकांमध्ये असलेल्या आदरातिथ्यातून दिसून येते. दळणवळण, शिक्षण, कौशल्य आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नोकऱ्या निर्माण करणाऱ्या आणि राज्याचा विकास करणाऱ्या भविष्यात होऊ घातलेल्या आणि पूर्ण झालेल्या अनेक प्रकल्पांसाठी त्यांनी मेघालयच्या जनतेचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक योगायोग उपस्थितांच्या लक्षात आणून दिला. आजचा कार्यक्रम अशावेळी एका फुटबॉल मैदानावर होत आहे, जेव्हा फुटबॉल विश्वचषक सामने सुरु आहेत. “एकीकडे फुटबॉल स्पर्धा सुरु आहे, आणि आपण इकडे फुटबॉल मैदानात विकासाची स्पर्धा भरवली आहे. जरी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कतारमध्ये होत आहेत, इथल्या लोकांमध्ये देखील उत्साह काही कमी नाही,” पंतप्रधान म्हणाले. एखाद्या खेळाडूने खिलाडूवृत्तीचा भंग केल्यास फुटबॉल मध्ये दाखवल्या जाणाऱ्या रेड कार्डचा संदर्भ देत, पंतप्रधान म्हणाले, सरकारने ईशान्य भारताच्या विकासात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना रेड कार्ड दाखवले आहे. “या भागाच्या विकासात अडथळा उभा करणारा मग तो भ्रष्टाचार असो, भेदभाव असो, परिवारवाद असो, हिंसाचार किंवा मत पेढीचे राजकारण, या सगळ्या कुप्रथा उखडून फेकण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करत आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले. जरी या सामाजिक कुप्रथा फार खोलवर रुजलेल्या होत्या, तरी आपल्याल्या त्या पूर्णपणे उखडून फेकण्यासाठी काम करावे लागेल, आणि सरकारच्या प्रयत्नांना यश येत आहे, असे ते म्हणाले.
ईशान्य हे केवळ सीमावर्ती क्षेत्र नाही तर सुरक्षा आणि समृद्धीचे प्रवेशद्वार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सीमावर्ती गावांना चांगल्या सुविधा पुरवल्या जात असलेल्या, समृद्ध ग्राम योजनेची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.शत्रूला लाभ होण्याच्या भीतीमुळे सीमावर्ती भागात दळणवळणाच्या सुविधांचा प्रसार झाला नसल्याची खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली."आज आम्ही धैर्याने सीमेवर नवीन रस्ते, नवीन बोगदे, नवीन पूल, नवीन रेल्वे मार्ग आणि एअर स्ट्रीप्स बांधत आहोत.ओसाड पडलेल्या सीमावर्ती गावांना चैतन्यशील बनवले जात आहे. शहरांसाठी आवश्यक असलेला वेग आपल्या सीमांसाठी देखील आवश्यक आहे,”असे पंतप्रधान म्हणाले.