Ins Mormugao : आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी INS मुरमुगाव' ही युद्धनौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर या युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ही युद्धनौका ताब्यात घेतल्याने भारतीय नौदलाची ताकद चांगलीच वाढली आहे. मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये सध्या ही युद्धनौका तैनात आहे. या शक्तीशाली युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार असून देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात मजबूत होणार आहे.  शत्रूला धडकी भरणाऱ्या  INS मोरमुगाओची खास वैशिष्ट आहेत. 


Ins Mormugao : INS मोरमुगाओची खास वैशिष्ट


19 डिसेंबर 2021 रोजी या युद्धनौकेने प्रथमच समुद्रात पाऊल ठेवले होते. संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शक्तीशाली युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाईन ब्युरो'ने केली असून ती मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बनवली आहे.


ही पूर्णपणे स्वदेशी युद्धनौका असून भारताने बांधलेली सर्वात प्राणघातक युद्धनौका आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सिंग उपकरणे, आधुनिक रडार आणि पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांसारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.


नौदलाने सांगितले की, या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. या युद्धनौकेमध्ये चार शक्तिशाली गॅस टर्बाइन आहेत, ज्याच्या मदतीने ही युद्धनौका 30 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने धावू शकते.
 
ही युद्धनौका रिमोट सेन्सिंग उपकरणे, आधुनिक रडार आणि पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट लाँचर आणि टॉर्पेडो यासारख्या शस्त्रांनी सुसज्ज आहे. यामुळे शत्रू देशाचे जहाजांपेक्षा वरचढ राहणार आहे. 


या युद्धनौकेत बसवण्यात आलेली क्षेपणास्त्रे 70 किमी अंतरावरून आकाशात उडणाऱ्या विमानांना आणि 300 किमी अंतरावरून जमिनीवर किंवा समुद्रावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहेत.
 
आधुनिक रडारच्या मदतीने नौदलाचे हेलिकॉप्टर अत्यंत खराब हवामानातही या युद्धनौकेवर उतरू शकतील. आयएनएस मुरगाव 127 मिमी तोफाने सुसज्ज आहे. यात AK-630 अँटी मिसाइल गन सिस्टिमही आहे.
 
ही युद्धनौका प्रोजेक्ट 15B अंतर्गत तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पात चार विनाशकारी युद्धनौका बांधल्या जात आहेत. या प्रकल्पातील पहिले जहाज INS विशाखापट्टणम गेल्या वर्षी भारतीय नौदलात सामील झाले होते. उर्वरित दोन युद्धनौकांचे (आयएनएस इंफाळ आणि आयएनएस सुरत) बांधकामही माझगाव डॉकयार्ड येथे वेगाने सुरू आहे.


ही स्वदेशी युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धादरम्यानही बचाव करण्यास सक्षम आहे. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा बाह्य स्तर विशेष स्टीलचा बनलेला आहे, ज्यामुळे शत्रू रडारवर त्याचा शोध घेऊ शकत नाही.
 
यापूर्वी INS कोलकाता, INS कोची आणि INS चेन्नई प्रकल्प 15A अंतर्गत अस्तित्वात आल्या आहेत. प्रोजेक्ट 15A ची खास गोष्ट म्हणजे प्रमुख रशियन प्रणाली स्वदेशी प्रणालींनी बदलण्यात आल्या.


प्रोजेक्ट 15B अंतर्गत, भारत जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र नाशके तयार करत आहे. त्यांची गुणवत्ता अमेरिका आणि युरोपमधील प्रसिद्ध जहाजबांधवांना टक्कर देते.