The New Secretariat of Telangana : लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण सरकारी यंत्रणांनी भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या आदर्शांना साकार करण्यासाठी काम करावे, या उद्देशाने तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ बी. आर. आंबेडकरांचे (Dr. B R Ambedkar) नाव देण्यात आल्याचे प्रतिपादन तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Chief Minister K Chandrasekhar Rao) यांनी केले. तेलगंणाच्या नव्या सचिवालयाचे के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आंबेडकरांचे नाव देण्यामागील उद्देश समजावून सांगितला. 


तेलंगणा सचिवालयाची भव्य अशी इमारत साकारण्यात आली असून ती  265 उंच असून तब्बल 28 एकर जागेत विस्तारली आहे. सचिवालयाचे लोकार्पणानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या भव्य सचिवालय संकुलाचे उद्घाटन करणे ही आयुष्यातील सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. ते पुढे म्हणाले की, आंबेडकरांच्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी, सचिवालयात नियमितपणे येणारे सर्व कर्मचारी आणि मंत्री त्यांचे नाव लक्षात ठेवण्यासाठी आणि काम करताना त्यांचा संदेश लक्षात ठेवण्यासाठी, आम्ही आमच्या सचिवालयाचे आंबेडकर नाव ठेवले, जो राज्य प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी झालेले आंदोलन गांधीवादी विचाराने होते. संविधानातील कलम 3 समाविष्ट करण्याच्या आंबेडकरांच्या संकल्पनेमुळे राज्याचा दर्जा प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. 


कसे आहे नवे सचिवालय? 


नवीन सचिवालयाचे घुमट निजामाबादमधील काकतीय काळातील नीलकंतेश्वर स्वामी मंदिराच्या धर्तीवर साकारण्यात आले आहेत. तेलंगणातील वाणपर्थी 'संस्थानम' या राजघराण्याच्या राजवाडा आणि गुजरातमधील सारंगपूर येथील हनुमान मंदिराच्या डिझाईनमध्ये बांधण्यात आले आहेत. 27 जून 2019 रोजी सचिवालयाच्या बांधकामाची पायाभरणी केसीआर यांनी केली होती. परंतु कोविड-19 महामारी, न्यायालयीन अडचणी आणि इतर समस्यांमुळे उशीर झाल्याने जानेवारी 2021 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. ही इमारत 265 फूट उंच असून राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात कोणत्याही राज्यात इतके उंच सचिवालय नसल्याचा दावा केला आहे. हे देशातील सर्वात मोठ्या सचिवालयांपैकी एक आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


विरोधकांना फटकारले 


यावेळी बोलताना केसीआर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. केसीआर म्हणाले की, "तेलंगणाची पुनर्बांधणी करण्याचा अर्थ असा नाही की जुन्या वास्तू पाडल्या जातील आणि नवीन इमारती उभारल्या जातील. ज्यांना तेलंगणाच्या पुनर्रचनेबद्दल माहिती नाही त्यांना सांगायचं आहे की, तेलंगणाची पुनर्बांधणी म्हणजे अविभाजित आंध्र प्रदेशकडे लक्ष न दिल्याने कोरड्या पडलेल्या राज्यातील सर्व तलावांचे पुनरुज्जीवन करणं आहे." तेलंगणाच्या पुनर्बांधणीची इच्छा पचवू न शकणाऱ्या काही शक्ती राज्याचा सर्वांगीण विकास पाहण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.


यावेळी राज्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि संबंधितांचे यावेळी आभार मानले. रविवारी सकाळी 6 पासून 'सुदर्शन यागम' करण्यात आला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास विधी संपल्यानंतर मुख्यमंत्री राव यांनी सहाव्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर राज्य सरकारमधील इतर मंत्र्यांनीही आपापल्या दालनात प्रवेश केला. 


इतर महत्वाच्या बातम्या