Congress 137th Foundation Day : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला आज 136 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचा स्वातंत्र्याचा लढा हा अनेक मार्गाने लढण्यात येत होता. त्यामध्ये क्रांतीकारी चळवळ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील चळवळ महत्वाच्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात काँग्रेसची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरली. पण काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत या संघनटेवर काँग्रेस विरोधकांकडून अनेक आरोप केले गेले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा आरोप म्हणजे काँग्रेस ही ब्रिटिशधार्जिनी संघटना होती. याच संबंधित 'सेफ्टी व्हॉल्व थेअरी' (Safety Valve Theory) नेहमी चर्चेत येते.
'सेफ्टी व्हॉल्व' म्हणजे काय?
आपण घरी प्रेशर कुकर पाहतो. ज्यामध्ये खूप प्रेशर निर्माण होतं. पण ते प्रेशर बाहेर पडण्यासाठी त्याच्या वरती एक शिट्टी बसवली असते. त्या शिट्टीच्या माध्यमातून अतिरिक्त प्रेशर बाहेर सोडलं जातं. नेमकं याच प्रमाणे 'सेफ्टी व्हॉल्व थेअरी' आहे.
1857 साली झालेला भारतीयांच्या असंतोषाचा उद्रेक ब्रिटिशांनी पाहिला होता. त्यामुळे भारतीय वसाहतीवर आपली सत्ता कायम ठेवायची असेल तर अशा प्रकारचा सशस्त्र उठाव पुन्हा होऊ न देणं हा ब्रिटिशांचा प्रयत्न राहिला. त्याचाच एक भाग म्हणून भारतीयांच्या असंतोषाला कुठेतरी वाट करुन देण्यासाठी ब्रिटिश अधिकारी ए. ओ. ह्युम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची संकल्पनेला मूर्त स्वरुप दिल्याचं सांगितलं जातं. यालाच 'सेफ्टी व्हॉल्व थेअरी' किंवा सुरक्षा झडपेचा सिद्धान्त असं म्हटलं जातं. ही थेअरी सर्वप्रथम जहाल नेते लाला लजपत राय यांनी मांडली.
1857 चा सशस्त्र उठाव दडपल्यानंतर देशाला शस्त्राच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणं शक्य नाही असं काही बुद्धीवाद्यांचं मत बनलं. हे बुद्धीवादी लोक म्हणजे ब्रिटिशांच्या सानिध्यात आलेले, युरोपमध्ये शिकलेले आणि तिथली लोकशाही व्यवस्था जवळून पाहिलेले, त्याचा अभ्यास केलेले लोक होते.
नॅशनल कॉन्फरन्सची दोन अधिवेशनं
1870 ते 1880 च्या काळात देशात अनेक संघटना स्थापना झाल्या. याच संघटना काँग्रेसच्या स्थापनेला कारणीभूत ठरल्या. त्यापैकीच एक असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून काँग्रेसच्या स्थापनेसाठी पाया तयार झाला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे दोन नॅशनल कॉन्फरन्सचे मोठे नेते होते. इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं 1883 साली पहिलं अधिवेशन आणि 1885 साली दुसरं अधिवेशन पार पडलं. त्यासाठी देशभरातून लोक हजर राहिले होते. नंतर या संघटनेचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आलं.
ए.ओ. ह्युम यांचा पुढाकार आणि काँग्रेसची स्थापना
निवृत्त आयसीएस अधिकारी अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम म्हणजे ए.ओ. ह्युम यांचं नाव ब्रिटिश आणि उच्चवर्गीय भारतीयांमध्ये मोठ्या आदरानं घेतलं जायचं. ह्युम यांनी उच्चशिक्षित आणि उच्चवर्गीय भारतीयांना एकत्र केलं आणि कॉंग्रेसची स्थापना केली. काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, बद्रुदिन तय्यबजी, फिरोजशहा मेहता, पी. आनंद चार्लू, महादेव गोविंद रानडे, मदन मोहन मालविय अशा अनेक भारतीयांचा समावेश होता.
29 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील सर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडलं. त्याला देशभरातून एकूण 72 लोक उपस्थित होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर दरवर्षी डिसेंबरमध्ये अधिवेशन घेण्याचं ठरलं.
लॉर्ड डफरिनचा पाठिंबा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे झाल्याचं सेफ्टी व्हॉल्व थेअरीत म्हटलं गेलंय. सुरुवातीला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डफरिन यांचा काँग्रेसच्या स्थापनेला विरोध होता. पण ह्युम यांनी त्यांची मनधरणी केली. भारतीयांच्या असंतोषाला एक व्यासपीठ करुन देणं आणि जन उठाव न होऊ देणं हे त्यामागचं राजकारण होतं.
ब्रिटिशांच्या राजकारणासाठी काँग्रेसची स्थापना?
ब्रिटिशांच्याकडे झुकलेले इतिहासकार असं मत मांडतात की, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याची कुवत ही भारतीयांमध्ये कधीच नव्हती. ब्रिटिशांच्या राजकारणासाठी ह्युम या अधिकाऱ्याने काँग्रेसची स्थापना करण्याची संकल्पना मांडली.
ए. ओ. ह्युम यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी ब्रिटिशांनी त्याला विरोध करु नये यासाठी ब्रिटिश सरकारची मनधरणी केल्याचं अनेक इतिहासकार सांगतात. परदेशात शिकलेले काही मूठभर भारतीय आता त्यांच्या संविधानिक अधिकारांबद्दल सजग झाले आहेत. त्यांच्या सनदशीर राजकारणासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास ते अधिक नियंत्रणात राहतील. मग या व्यासपीठाच्या माध्यमातून ते सनदशीर मार्गाने अर्ज-विनंत्या करत राहतील.
सेफ्टी व्हॉल्व थेअरीचे सर्वाधिक समर्थन केलं ते मार्क्सवादी नेत्यांनी. काँग्रेस नेते हे ब्रिटिशधार्जिने असल्याचा त्यांनी नेहमीच आरोप केला आहे. आर. पी. दत्ता म्हणतात की, भारतामध्ये 1857 सारखा जनउठाव पुन्हा होऊ नये यासाठी ब्रिटिशांनी काँग्रेसच्या स्थापनेला पाठिंबा दिला.
आधुनिक भारतीय इतिहासकार काय म्हणतात?
आधुनिक इतिहासकारांनी सेफ्टी व्हॉल्व थेअरी साफ नाकारली आहे. आणि जरी ए. ओ. ह्युम यांनी त्या वेळच्या काँग्रेस नेत्यांचा सेफ्टी व्हॉल्व प्रमाणे वापर केला असला तरी त्या वेळच्या नेत्यांनी ए.ओ. ह्युम यांचा 'लायटनिंग कंडक्टर'सारखा वापर केल्याचं स्पष्ट होतंय. भारतीय नेत्यांनी ह्युम यांच्या मदतीने आखिल भारतीय स्तरावरील एका मोठ्या संघटनेची स्थापना केली ज्या संघनेटने पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक भूमिका बजावली.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ज्या परिस्थितीत झाली ती पाहता जर केवळ भारतीयांनी अशी संघटना स्थापन करायचा प्रयत्न केला असता तर तर ब्रिटिशांनी ते कधीही होऊ दिलं नसतं. पण तत्कालीन उच्चवर्गीय भारतीयांनी ब्रिटिश व्यक्तीच्या मदतीने ही संघटना उभारली आणि नंतरच्या काळात या संघटनेला तळागाळातल्या नागरिकांचा पाठिंबा मिळाला.
सुरुवातीला मवाळ राजकारण
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 म्हणजे बंगालच्या फाळणीपर्यंत मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिशांना थेट विरोध करण्याचं टाळून सनदशीर मार्गाने केवळ अर्ज-विनंत्याचं राजकारण केलं. ब्रिटिशांना अर्ज विनंत्या करणे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यावर त्यांनी भर दिला.
बंगालची फाळणी आणि जहाल कालखंड
ब्रिटिशांनी बंगालची फाळणी करण्याची घोषणा केली आणि भारतीयामध्ये असंतोष वाढायला सुरुवात झाला. या काळात काँग्रेसमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. मग लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या असंतोषाला नवी दिशा देत काँग्रेसमधून मवाळांचं वर्चस्व कमी केलं. 1905 सालच्या बंगालच्या फाळणीनंतर मवाळांच्या अर्ज-विनंत्यांच्या राजकारणाचा काही उपयोग नसून जहाल राजकारणाची गरज असल्याचं टिळकांनी पटवून दिलं. त्यांच्या सोबतीला लाला लजपत राय आणि बिपीन चंद्र पाल हे नेतेही होते. या काळात वैयक्तिक स्तरावर अनेक क्रांतीकारकांनी सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न केला. 1905 ते 1920 पर्यंतचा कालखंड आहे काँग्रेसचा जहालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो.
गांधीवादी राजकारण आणि काँग्रेसला जनआंदोलनाचं स्वरुप
सन 1920 नंतर महात्मा गांधींनी आपल्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या राजकारणाला सुरुवात केली. याच काळात काँग्रेसला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचं स्वरुप आलं. गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, छोडो भारत अशी मोठी आंदोलनं झाली. या आंदोलनात खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयाने भाग घेतला.
सन 1885 साली काही उच्चवर्गियांचा समावेश असलेल्या काँग्रेसने नंतरच्या काळात व्यापक स्वरुप धारण केलं आणि प्रत्येक भारतीयांनी ती आपली वाटू लागली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये काँग्रेसची भूमिका ही निर्णायक ठरली. देशात एक लोकशाहीवादी चळवळ उभारणे, नागरिकांमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जागरुकता निर्माण करणे, संपूर्ण देशभरातील राष्ट्रवादी विचारसरणीला एक दिशा देणे हे काँग्रेसने काम केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेमागे सेफ्टी व्हॉल्व थेअरी असल्याचा दावा करणाऱ्यांना नंतरच्या काळात त्याच काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे नाकारता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदाच 'झाशीच्या राणी'समोर नतमस्तक; काय सांगतो लक्ष्मीबाई आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या दुश्मनीचा इतिहास?
- Explanier : जैवविविधता कायद्यातील सुधारणा काय आहेत? पर्यावरणवाद्यांचा त्याला विरोध का आहे? जाणून घ्या सोप्या शब्दात
- शेतकरी विरोधी भूमिका घ्याल तर पुन्हा आंदोलन, कृषीमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार