Shashi Tharoor : सहा महिला खासदारांसोबतच्या फोटोनंतर शशी थरुर ट्रोल, द्यावं लागलं स्पष्टीकरण
Shashi Tharoor Selfie Controversy: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सोशल मीडियावर सहा महिला खासदारांसोबतचा फोटो पोस्ट केला होता.
Shashi Tharoor Selfie Controversy: संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सोशल मीडियावर सहा महिला खासदारांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन चर्चांना उधाण आलं असून या वरुन दोन गट पडल्याचं दिसत आहे. या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे शशी थरुर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. नेटकऱ्यांनी शशी थरुर यांच्यावर टीकास्त्र सोडत नाराजी व्यक्त केली. नेटकऱ्यांची नाराजी पाहून खासदार शशी थरुर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे फोटोत नेमकं?
सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या आसपास शशी थरुर यांनी एक फोटो ट्वीट केला. यामध्ये ते सहा महिला खासदारांसोबत दिसत आहेत. फोटोमध्ये सर्वात पुढे उभ्या असलेल्या माहिला खासदारानेच हा सेल्फी फोटो काढलाय. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही दिसत आहेत. याशिवाय खासदार परनित कौर, खासदार नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि डीएमकेच्या खासदार थामीझाची या दिसत आहेत. थरुर यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना सहाही महिला खासदारांना टॅग केलेय.
कॅप्शनमध्ये काय म्हटलेय?
शशी थरुर नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या कॅप्शनमुळे चर्चेत असतात. सहा महिला खासदारांसोबतचा फोटो पोस्ट करताना थरुर यांनी असेच कॅप्शन दिलेय. ते म्हणतात,“कोण म्हणतेय की लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाहीय?, सकाळी माझ्यासोबतच्या सहकारी सहा महिला सहकारी खासदारांसोबत.”
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल –
महिला खासदारांसोबतच्या फोटोनंतर सोशल मीडियावर शशी थरुर ट्रोल झालेत. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनवरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं असून नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचं दिसत आहे. महिला या फक्त सौंदर्यासाठी ओळखल्या जात नाहीत, असा टोला काही नेटकऱ्यांना लगावलाय. लोकसभेचं कामकाज अधिक आकर्षक होण्यासाठी महिला तिथे नाहीत. त्या सभागृहाच्या सदस्य आहेत. तुम्ही त्यांचा अपमान करत आहात, असेही एका युजर्सनं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी थरुर यांचं ट्वीट गांभिर्यानं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलेय. तर काहींनी चुकीचा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलेय.
शशी थरुर यांचं स्पष्टीकरण -
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर शशी थरुर यांनी या फोटोबाबत स्पषीटकरण देत माफी मागितली आहे. ट्वीट करत ते म्हणाले की, कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफ करा. महिला खासदारांच्या पुढाकाराने हा फोटो विनोदी पद्धतीने काढण्यात आला आहे. खासदारांनी मला फोटो ट्वीट करण्यास सांगितले होतं.