Tesla CEO Elon Musk India Visit : नवी दिल्ली : टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भेटण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. जिथे ते भारतात गुंतवणूक करण्याच्या आणि नवा कारखाना उघडण्याच्या त्यांच्या योजनांवर चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एलन मस्क (Elon Musk) 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर असतील. एलन मस्क नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात.


एलन मस्क यांचा हा पहिलाच भारत दौरा (Elon Musk First Time in India) असेल, असं रॉयटर्सच्या अहवालात म्हटलं आहे. एलन मस्क यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांच्या गुंतवणुकीची योजना आणि भारतात इलेक्ट्रिक कार प्लांटची घोषणा करू शकतात, असं बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला कार भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. अशातच भारतीय ग्राहकही टेस्ला कारची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 


टेस्ला प्लांटसाठी एलन मस्क यांचा भारत दौरा 


रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एलन मस्क लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. मस्क यांच्याकडून भारत दौऱ्याबाबत अधिकृत ट्वीट देखील करण्यात आलं आहे. एलन मस्क भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात टेस्लाकडून गुंतवणूक आणि मॅन्युफॅक्चरींग प्लांटसंदर्भात चाचपणीसाठी एलन मस्क दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. टेस्लाकडून भारतात प्लांट उभारणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूत मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या जागांसाठी चाचपणी केली जात आहे. मोदी आणि मस्क यांची गेल्या वर्षी जूनमध्ये भेट झाली होती, त्यात भारतातील इलेक्ट्रीक गाड्यांवरील आयात कर कमी व्हावा, अशी मागणी एलन मस्क यांनी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून नवं ईव्ही धोरण राबवत आयात कर कमी करण्यात आला आहे, ज्याचा मोठा फायदा टेस्लाला होणार आहे. 


रिलायन्ससोबत करार करण्याचीही शक्यता 


काही दिवसांपूर्वी टेस्ला भारतात आपलं बस्तान बसवण्यासाठी स्थानिक भागीदाराच्या शोधात असल्याचं समोर आलं होतं. द हिंदू बिझनेसलाईनच्या वृत्तानुसार, अमेरिकन ऑटो कंपनी रिलायन्ससोबत संयुक्त उपक्रम राबवत भारतात प्लांट बांधण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टेस्लासाठी संभाव्य ठिकाणांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या अहवालात प्लांटसाठी महाराष्ट्राकडे टेस्लाचं झुकतं माप असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI