Telangana Former CM KCR Admitted At Hospital : हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Former Telangana Chief Minister K Chandrashekar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केसीआर (KCR) पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. हैदराबादच्या (Hyderabad) यशोदा रुग्णालयात केसीआर यांना दाखल करण्यात आलं आहे. केसीआर काल (गुरुवारी) रात्री एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर पाय घसरुन पडले. आता त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडणार आहे. 


दरम्यान, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाले आहेत. काँग्रेसनं तेलंगणात बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं असून दोनदा तेलंगणाचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. पण, यंदा मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक करण्याची काँग्रेसनं संधी हिसकावून घेतली. 






मुलीनं ट्वीट करून दिली माहिती 


केसीआर यांच्या मुलीनं ट्वीट करून केसीआर पाय घसरुन पडल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.






119 जागांच्या तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. केसीआर यांची मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रिक हुकली. 2013 मध्ये राज्याच्या स्थापनेपासूनच केसीआर सत्तेवर होते. या निवडणुकीत काँग्रेसनं 64 जागा जिंकल्या आहेत, तर बीआरएसनं 39 जागा जिंकल्या आहेत. भाजपनं 8 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनीही 8 जागा जिंकल्या आहेत.


काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होते. रेवंत हे काँग्रेसचे तेलंगणा प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत आणखी 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.