DRDO Scientist Pradeep Kurulkar: देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला (Pakistani Intelligence Agency) पाठवल्याप्रकरणी डीआरडीओचे (DRDO) अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना अटक करण्यात आलेली. त्यानंतर डॉ. प्रदीप कुरुलकरांनी आपल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळला आहे. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखवण्याची तयारी दर्शवली होती, असं त्यांच्या व्हॉटस्अप चॅटमधून स्पष्ट झालेलं.


पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देशाची गोपनिय माहिती पुरवल्याच्या आरोपांखाली डीआरडीओचे वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज कुरुलकरांनी फेटाळून लावला आहे. देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून डॉ. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहेत. 


डॉ. कुरुलकर यांनी अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. कुरुलकर यांनी मोबाईलमधील काही डाटा डिलीट केला आहे. तसेच, जप्त करण्यात आलेला एक मोबाईल नादुरूस्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी तो गुजरात येथे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. दरम्यान, डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखवण्याची तयारी दर्शवली होती, असं त्यांच्या व्हॉटस्अप चॅटमधून स्पष्ट झालं होतं. दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे चॅट समोर आलं होतं. 


प्रदीप कुरुलकरवर नेमका आरोप काय?


डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. 


या संवादादरम्यान डॉ. प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली. त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.