RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पुन्हा एकदा रेपो रेट (RBI Repo Rate) जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर (MPC Meeting) RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, समितीनं पुन्हा एकदा रेपो दरांत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर सध्या 6.5 टक्के आहे. मात्र, आता रिझर्व्ह बँक (RBI) आता यावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचंही शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी सांगितलं आहे.  


सहापैकी पाच सदस्यांकडून मान्य 


2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पाचव्या पतधोरण बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "रेपो दर सध्या स्थिर राहील. आरबीआयच्या बैठकीत 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचा 'withdrawal of accommodation' ही भूमिका कायम आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर 4 टक्क्यांच्या खाली आणण्यावर भर दिला जाईल.


जीडीपी 7 टक्के दरानं वाढण्याची अंदाज 


आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाची वाढ 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी आरबीआयनं 6.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. ते म्हणाले की, जीडीपी तिसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6 टक्के दरानं वाढेल. दास म्हणाले की, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी ग्रोथ 6.7 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे.


रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर


भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या अनेक बैठकांमध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पाचव्या बैठकीतही रेपो दर स्थिर राहण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत होते. काही तज्ज्ञ असंही म्हणतात की, केंद्रीय बँक जून 2024 पर्यंत रेपो दरांत कोणताही बदल करणार नाही, कारण RBI चं लक्ष्य महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली आणण्याचं आहे.


फेब्रुवारीपासून रेपो दर जैसे थे 


फेब्रुवारीपासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या सर्व पतधोरण बैठकांमध्ये रेपो दरांत कोणताही बदल झालेला नाही. रेपो रेट सध्या 6.5 टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आरबीआय 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आधी रेपो रेटमध्ये कपात करणार नाही आणि तो सध्या स्थिर राहील.


रेपो दर वाढल्यानं कर्ज कसं महाग होतं?


रेपो रेट म्हणजे, रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दरानं कर्ज देते आणि बँका हा पैसा लोकांना कर्ज म्हणून देतात. या कारणास्तव, जेव्हा जेव्हा रेपो दरांत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम कर्जाच्या EMI वर होतो. म्हणजेच, रेपो रेट वाढल्यास कर्जाचा ईएमआयही वाढतो.


रेपो रेट म्हणजे काय?


ज्याप्रमाणे अनेक जण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात आणि त्याची निश्चित व्याजासह परतफेड करतात, त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकांनाही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना ज्या व्याजदराने कर्ज दिले जाते. त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट कमी झाला की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो आणि रेपो दर वाढला की सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतात.