BJP Mission South : तेलंगणामधील हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या 3 जुलैला पंतप्रधानांची ही सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी तेलंगणा भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येनं लोकांना आमंत्रित करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. 10 लाख लोक या सभेसाठी आणण्याचे नियोजन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, 3 जुलैला होणाऱ्या सभेसाठी पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे बडे नेते सभेला संबोधित करणार आहेत.


तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार, राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे राष्ट्रीय प्रभारी अरविंद मेनन आणि राष्ट्रीय भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष डॉ. के लक्ष्मण यांनी या संदर्भात तयारीचा आढावा घेतला. खासदार बंदी संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी येथील प्रदेश कार्यालयात मतदारसंघ प्रभारींची बैठक झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10,000 लोकांना आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी भाजपच्या नेत्यांनी दिली. 


पंतप्रधान मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरु  


पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन भाजपच्या नेत्यांनी केलं आहे. तेलंगणाच्या इतिहासात ही अभूतपूर्व अशीच सभा होणार आहे. बंदी संजय कुमार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक घरोघरी सभेचं आमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सुमारे 50 लाख निमंत्रण पत्रिका छापल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10 हजार लोक येणार


3 जुलै रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किमान 10,000 लोक पोहोचतील अशी भाजपची अपेक्षा आहे. 2013 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नामांकन झाल्यानंतर, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात हैदराबादच्या एलबी स्टेडियममधून केली होती. या रॅलीसाठी लोकांकडून पाच रुपयांचे तिकीट घेण्यात आले होते.