Agneepath Protest : लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध कायम आहे. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून हिंसक निदर्शनं सुरुच आहेत. आज अग्निपथ योजनेविरोधात 'भारत बंद'ची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारमधील तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातल पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
देशभरातील अग्निपथ योजनेला होणार विरोध निवळण्याचं नाव घेत नाहीय दिवसेंदिवस योजनेला होणारा विरोध आणि निदर्शनं वाढत आहेत. एनक राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण या योजने विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अग्निपथ योजनेसंदर्भात तिन्ही सैन्य दलाकडून रविवारी एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अग्निपथ योजनेचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या तरुणांनी सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.
बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद
अग्निपथ योजनेला होणार विरोध पाहता बिहार प्रशासनही सतर्क झालं आहे. बिहारमध्ये 17 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 18 रोजी काही विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिली होती, यावेळी डाव्यांनी बंदला पाठिंबा दिला होता. यानंतर आज विद्यार्थ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे.
भारत बंदमुळे पंजाब पोलीस सतर्क
सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी होणाऱ्या संभाव्य भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पंजाबमधील सर्व प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांभोवती सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हरियाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
यासोबतच हरियाणामध्येही लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत फरिदाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सर्व तयारी पूर्ण केली आहे. सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आज फरिदाबादमध्ये २ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
झारखंडमध्ये शाळा बंद राहणार
अग्निपथ योजनेला झालेल्या विरोधाचा नकारात्मक परिणाम मध्य भारतातही दिसून येत आहे. तरुणांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झारखंडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झारखंडमधील सर्व शाळा सोमवारी बंद राहणार आहेत.