Anand Mahindra On Agneepath: भारतीय सैन्यात अग्निपथ योजनेतून भरती करण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेनुसार फक्त चार वर्षांसाठी ही नियुक्ती असणार असल्याने देशभरातून याला विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. उद्योजक आनंद महिंद्रा हे देखील या हिंसक आंदोलनाने व्यथित झाले असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे.


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी म्हटले की,  अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर ज्यापद्धतीने हिंसाचार उफाळला आहे, त्यामुळे दु:खी आणि निराश झालो आहे. मागील वर्षीदेखील या योजनेवर विचार करण्यात आला तेव्हा, या योजनेमुळे शिस्त आणि कौशल्य असलेले अग्निवीर उपलब्ध होतील. हे अग्निवीर अधिक रोजगार सक्षम होतील असे मी म्हटले होते. आता, या अग्निवीर युवकांना आम्ही नोकरीची संधी देणार असल्याची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली. 


 






कोणती नोकरी देणार?


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर काही युजर्सकडून अग्निवीरांना कोणती नोकरी देण्यात येणार असा प्रश्न केला. यावर त्यांनी, कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व कौशल्य, टीम वर्क आणि शारिरीक प्रशिक्षण यामुळे अग्निवीरांच्या रुपाने उद्योगजगताला व्यावसायिक मनुष्यबळ मिळेल असे त्यांनी म्हटले. या व्यक्ती प्रशासन, सप्लाय चेन व्यवस्थापन आदींमध्ये काम करू शकतात. 






अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण


शनिवारी झालेल्या बैठकीत अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नागरी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्ट गार्ड आणि डिफेन्स पीएसयूमध्येही 10 टक्के कोटा दिला जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 


भारत बंदची हाक


आज अग्निपथ योजनेविरोधात 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारमधील तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.