जगतियालच्या पोलिस अधीक्षक सिंधु शर्मा यांनी अपघातात 45 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की, "आतापर्यंत 45 जण मृत्यूमुखी पडले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य सुरु आहे."
अपघातावेळी तेलंगणा राज्य रस्ते परिवहन मंडळ (टीएसआरटीसी) च्या बसमध्ये एकूण 62 जण प्रवास करत होते. ही बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिरावरुन जगतियाल जात होती. रस्त्यावर उतार होता. या रस्त्यावर वळण घेताना बसचा ब्रेक फेल झाला आणि बस दरीत कोसळली. दरीत कोसळण्याआधी बस आधी चार वेळा पलटली होती.
जगतियालच्या जिल्हाधिकारी शरत हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश त्यांनी दिली आहे. तर सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.