श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. हंडवाड्यातील गुलूरा भागात ही चकमक घडली. मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याची बहिणीचं आज लग्न होतं.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, तसेच दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याचीही माहिती अजून मिळू शकली नाही. सध्या गुलूरा परिसरात पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडवाड्याच्या गुलूरा परिसरात काही दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसराला घेरुन सर्च ऑपरेशन सुरू केलं.
सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही दहशतवाद्यांवर गोळीबार केला, या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरूच ठेवलं आहे.