नवी दिल्ली : गाझियाबादमध्ये एप्रिल महिन्यात सुटकेसमध्ये सापडलेल्या गर्भवतीच्या मृतदेहाबाबत उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या करणाऱ्या दाम्पत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


माला गुप्ता या महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत एप्रिल महिन्यात सापडला होता. मालाचा पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ करुन तिची हत्या केली असावी, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. मात्र पोलिसांना या हत्येचं कोडं सोडवण्यात यश आलं. मालाच्या शेजारी राहणाऱ्या सौरभ दिवाकर आणि रितू या पती-पत्नीने चोरीच्या उद्देशाने तिचा जीव घेतल्याचं पोलिस तपासात समोर आलं.

हत्येच्या काही महिने आधी मालाचं लग्न झालं होतं. ती आपला पती शिवमसोबत भाड्याच्या घरात राहत होती. हत्येच्या आदल्या आठवड्यात तिचे नातेवाईक घरी आले असताना तिने महागडे दागिने आणि कपडे त्यांना दाखवले. हे पाहून शेजारी राहणाऱ्या रितूचे डोळेही चमकले.

रितूने घरी येऊन ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. मालाचा पती कामावर गेल्याचं निमित्त साधून रितूने तिला आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर रितू आणि सौरभने मालाची गळा आवळून हत्या केली.

मालाच्या घरी जाऊन रितूने तिची दागिने आणि कपड्यांची बॅग, मोबाईल चोरले. बॅगमधील सर्व वस्तू काढून त्यात मालाचा मृतदेह भरला. हत्येनंतर दोघांनी तिचा मृतदेह इंदिरापुरमला नेऊन टाकला. त्यानंतर रितू आपल्या मामाच्या घरी निघून गेली.

शिवमने पत्नीची शोधाशोध सुरु केली. मात्र तिचा काहीच ठावठिकाणा न लागल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल केली. त्याचवेळी गाझियाबादमध्ये सापडलेल्या मृतदेहाचं मालाशी साधर्म्य आढळलं.

पती शिवमनेच तिची हत्या केल्याचा दावा आधी माहेरच्यांनी केला होता. मात्र पोलिसांच्या चौकशीत हत्येच्या वेळी शिवम ऑफिसमध्ये असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी त्याला सोडून दिलं. परंतु घटनेच्या दिवसापासून शेजारी राहणारे रितू आणि सौरभ घरी न परतल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अखेर पाच महिन्यांनी पोलिसांनी या हत्येचं कोडं उलगडून दोघांना बेड्या ठोकल्या.