Tarun Tejpal Case Verdict : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा कोर्टानं दिलासा दिला आहे. तरुण तेजपाल यांच्यावर एका महिलेनं लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. गेल्या 8 वर्षांपासून तरुण तेजपाल यांच्याविरोधात हा खटला सुरु होता. अखेर गोवा कोर्टानं त्यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 


दरम्यान, एका महिलेनं तरुण तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तरुण तेजपाल यांना जामिन मंजूर झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी 2014 मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात 2,846 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. 


सुनावणीची तारिख सतत पुढे ढकलण्यात येत होती 


अतिरिक्त जिल्हा कोर्ट 27 एप्रिल रोजी निकाल जाहीर करणार होतं. परंतु, न्यायाधीश क्षमा जोशी यांनी या प्रकरणावरील निर्णयाला 12 मेपर्यंत स्थगिती दिली होती. 12 मे रोजी पुन्हा एकदा याप्रकरणावरील सुनावणी 19 मेपर्यंत पुढे ढकलली होती. कोर्टानं कारण देत सांगितलं होतं की, कोरोना महामारीमुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तरुण तेजपाल यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही आपल्यावरील आरोप सिद्ध होण्याविरोधात दाद मागितली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. 


कोणत्या कलमांतर्गत खटला चालू होता?


तरुण तेजपाल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 342, 354 (मारहाण किंवा सन्मानाचा भंग करण्याच्या हेतूने गुन्हेगारी शक्तीचा वापर), 354-ए (लैंगिक छळ), 376 (2) आणि 376 (2) (के) या कलमांतर्गत खटला सुरु होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :