बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएस यांच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. स्वतः मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी याबाबत हतबलता व्यक्त केली. आपण सत्तेत तर आहोत, मात्र नीलकंठासारखं विष प्यावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मी मुख्यमंत्री झाल्यामुळे तुम्ही सर्व जण खुश आहात. मात्र मी खुश नाही. मला नीलकंठासारखं विष प्यावं लागत आहे, असं म्हणताना कुमारस्वामी यांच्या डोळ्यात अश्रू आले. जेडीएसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कुमारस्वामी बोलत होते.

कुमारस्वामी यांनी पाच जुलै रोजी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. विधानसभेत 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही घोषणा केली. यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबाचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे.

कर्नाटकाच्या युतीत संघर्ष कशामुळे?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. मात्र भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने निवडणुकीनंतर जेडीएससोबत युती केली. काँग्रेसने जास्त जागा (78) जिंकूनही जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यांनी 23 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

खातेवाटप, शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती या मुद्द्यांवरुन काँग्रेस आणि जेडीएसमध्ये वाद पाहायला मिळाला. वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही कुमारस्वामी यांनी अनेकदा भेट घेतली आहे. मात्र कुमारस्वामींनी हतबलता व्यक्त केली आहे.