नवी दिल्ली : टाटा सन्सने (Tata Sons) एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली आहे. आज अधिकृतपणे टाटांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं.  






भारताची राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे आल्याची बातमी ब्लूमबर्गने गेल्या आठवड्यातच सूत्रांच्या हवाल्याने दिली होती मात्र तेव्हा अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील डिपार्टमेंट ऑफ इनव्हेस्टमेंट आणि पब्लिक अॅसेट्सने (DIPAM)याचा इन्कार केला होता. 


कर्जाच्या खाईत बुडालेल्या एअर इंडियाच्या खाजगीकरणाची चर्चा खूप दिवसांपासून होती, आता टाटा सन्सकडे एअर इंडियाची मालकी येणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एअर इंडियावर आज घडीला तब्बल 60 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. तब्बल 127 विमाने ताब्यात असलेल्या एअर इंडियाच्या 42 आंतरराष्ट्रीय सेवा आहेत. 






आजच्या निर्गुंवणुकीने भारत सरकारने एअर इंडियामध्ये असलेला आपला सर्व हिस्सा टाटा सन्सला विकला आहे. टाटा सन्स ग्रुपकडे सध्या हवाई सेवेत असलेल्या विस्तारा या कंपनीची 51 टक्के तर एअर एशिया इंडिया या कंपनीची 84 टक्के हिस्सेदारी आहे. टाटा सन्स ग्रुपने एअर इंडियाची मालकी जिंकल्याचं आज जाहीर झालं असलं तरी संपूर्ण व्यवहार पूर्ण होऊन एअर इंडियाचं टाटा सन्सकडे हस्तांतरण पूर्ण होण्यासाठी डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 


Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटांकडे; 68 वर्षांनी सांभाळणार जबाबदारी


टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती, हे इथे उल्लेखनीय आहे. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.  टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता. 


2007 मध्ये इंडियन एअरलाईन्स या देशांतर्गत विमानवाहतूक करणाऱ्या कंपनीचा आणि एअर इंडिया आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक करणाऱ्या कंपनीत विलय झाल्यापासून एअर इंडियाचा तोटा सातत्याने वाढत असल्याचं जाणकार सांगतात.