मुंबई: सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा चेअरमनपदी असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल.


सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती. चारवर्षापूर्वी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला होता.

सायरस मिस्त्री त्यावेळी शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रबंध निर्देशक होते. सायरस मिस्त्री २००६ पासून टाटा
ग्रृपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहेत.

सायरस मिस्त्री यांचं शिक्षण लंडनमध्ये झालंय. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण
घेतलंय. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतलं.

एक लाखांत चार चाकी गाडीचे स्वप्न ते जॅग्वारसारख्या बड्या कंपनीतील भागीदारी, अशा तमाम विक्रमांना नावावर करणारे रतन टाटा चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार महिन्यांसाठी ते चेअरमनपदी विराजमान होतील.

रतन टाटा यांची टाटा समूहातील कारकीर्द कमालीची यशस्वी ठरली
-----------------
*२८ डिसेंबर १९३७ ला भारतात जन्माला आलेले रतन टाटा यांनी १९७१ साली अध्यक्षपदाची सूत्र
हाती घेतली.

*रतन टाटा हे २१ वर्ष टाटा समुहाचे अध्यक्ष होते.

*१९७१ साली टाटा समूहाची उलाढाल होती १००० कोटी पण टाटांच्या
काळात २०१२ पर्यंत हाच आकडा ४ लाख ७५ हजार ७२१
कोटींवर पोहोचला

*२००० साली 'टाटा टी'ने इंग्लंडमधल्या टेटली हा प्रसिद्ध ब्रँड ताब्यात घेतला.

*२००७ साली ब्राझीलच्या बलाढ्य कंपनीला मागे टाकत टाटा स्टीलने कोरस कंपनी ताब्यात घेतली.

*त्यांनंतर वर्षभरातच फोर्ड कंपनीची जँग्वार लँडरोव्हर ही टाटांच्या ताब्यात आली

*मात्र पश्चिम बंगालमधल्या सिंगूरमध्ये टाटांचा महत्वाकांक्षी नॅनो प्रकल्प आकार घेऊ शकला नाही.

*अखेर रतन टाटांनी गुजरतचा प्रस्ताव स्वीकारला आणि टाटांची नॅनो भारतीयांच्या हातात आली.