चेन्नई : तामिळनाडूमध्ये वणव्यात अडकून जीव गमवाव्या लागलेल्या गिर्यारोहकांचा आकडा दहावर पोहचला आहे. तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातल्या कोलुक्कुमलई भागातील जंगलात रविवारी वणवा लागला होता. मृतांमध्ये आठ ते वीस वर्षे वयोगटातील तरुणींसह दहा ट्रेकर्सचा समावेश आहे.


चेन्नई, कोयंबतूर आणि तिरुपूरमधील 65 गिर्यारोहक शुक्रवारी रात्री ट्रेकिंगला निघाले होते. यामध्ये मुख्यत्वे महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि लहानग्यांसोबत आलेल्या कुटुंबांचा समावेश होता.

शनिवारी गिर्यारोहक केरळाजवळ जंगलात पोहचले. रविवारी सकाळी पुन्हा त्यांनी तामिळनाडू सीमेलगत कुरंगनीहून ट्रेकला सुरुवात केली मात्र दुपारच्या सुमारास कुरंगनी हिलवर लागलेल्या वणव्यात ते अडकले.

तामिळनाडूत वणव्यात अडकून पाच तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू


काही ट्रेकर्सनी फोनवरुन आपल्या कुटुंबीयांना या वणव्याची माहिती दिली. कुटुंबांनी याबाबत पोलिसांना कळवलं. ट्रेकिंग ग्रुपने वन विभागाकडून परवानगी न घेतल्यामुळे वनाधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.

हेलिकॉप्टरच्या मदतीने काही ट्रेकर्सची सुखरुप सुटका करण्यात आली. बचाव कार्य रविवारी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून सुरु झालं. वणव्यात होरपळून मृत्यू झालेल्यांचा आकडा सोमवारी दहावर पोहचला होता.