नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नरेश अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश करताच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ''माझं राज्यसभेचं तिकीट हे सिनेमात नाचणारीसाठी कापण्यात आलं,'' असं ते म्हणाले. समाजवादी पार्टीने यावेळी उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, यावेळी व्यासपीठावर असलेल्या भाजप नेत्यांना नरेश अग्रवाल यांच्या वक्तव्याच्या गांभीर्यतेचा अंदाज आला. व्यासपीठावरील भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी अग्रवाल यांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सिनेमात असो किंवा वास्तविक जीवनात, भाजप पक्ष सर्व सदस्यांचा सन्मानच करतो, असं पात्रा म्हणाले.

राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी समाजवादी पार्टीला रामराम करत भाजपात प्रवेश केला. जोपर्यंत राष्ट्रीय पक्षात जाणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समस्या सुटणार नाहीत, असं ते म्हणाले.

''मुलायम सिंग यादव आणि रामगोपाल यांची साथ कधीच सोडणार नाही. मी त्यांच्यासोबत आहे. सिनेमात डान्स करणारीसाठी माझं तिकीट कापण्यात आलं. माझा मुलगा आमदार आहे आणि तो राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आभार,'' असं वक्तव्य नरेश अग्रवाल यांनी केलं.

यावर्षी समाजवादी पक्षाचे सहा खासदार किरणमय नंदा, दर्शन सिंह यादव, नरेश अग्रवाल, जया बच्चन, मुनव्वर सलीम आणि आलोक तिवारी निवृत्त होत आहेत. उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टी यावेळी केवळ एकाच उमेदवाराला राज्यसभेवर पाठवू शकते. जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे.

नरेश अग्रवाल उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून आहेत. समाजवादी पक्षात येण्यापूर्वी ते मायावती यांच्या बसपामध्ये होते. नरेश अग्रवाल यांना तडजोडीच्या राजकारणात मास्टर मानलं जातं.

नरेश अग्रवाल यांचा पक्ष बदलाचा प्रवास

नरेश अग्रवाल यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात 1980 साली काँग्रेसमधून केली. त्यानंतर त्यांचा पक्ष बदलण्याचा आणि ज्यांची सत्ता असेल त्यांच्या पक्षात जाण्याचा इतिहास आहे. काँग्रेस सोडल्यानंतर लोकतांत्रिक काँग्रेसची स्थापना केली आणि भाजपच्या कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह सरकारमध्ये ते मंत्री झाले होते.

नरेश अग्रवाल 2002 साली मुलायम सिंग यादव यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि सपाची सत्ता जाताच बसपामध्ये प्रवेश केला. 2007 साली सपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, मात्र बसपाची सत्ता येताच ते बसपामध्ये सहभागी झाले. 2012 साली सपाचं अखिलेश यादव सरकार येताच ते पुन्हा सपामध्ये आले आणि राज्यसभेवर गेले. आता 2017 मध्ये सपाचं सरकार गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपशी जवळीक साधत भाजपात प्रवेश केला.