Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण करणारा स्वतंत्र भारद्वाज दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, कोणती कलमं लागणार? किती शिक्षा होणार?
Swatantra Bhardwaj: स्वतंत्र भारद्वाजच्या एका वक्तव्यामुळं राजकीय वाद निर्माण झाला आहे. स्वतंत्र भारद्वाज यानं एका पॉडकास्टमध्ये आंदोलक निशू आझादच्या वडिलांना मारहाण केल्याचं सांगितलं होतं.

Swatantra Bhardwaj Controversy नवी दिल्ली: सीजेपीनं नीट पेपरफुटीवरुन केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या निशू आझाद हिच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजच्या एका पॉडकास्टमुळं नवा वाद निर्माण झाला आहे. निशू आझादनं काल एक व्हिडिओ पोस्ट करुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे न्यायासाठी मदतीची मागणी केली होती. स्वतंत्र भारद्वाज यानं एका पॉडकास्टमध्ये निशू आझादच्या वडिलांच्या डोक्याला दुखापत केल्याचं सांगितलं होतं. स्वतंत्र भारद्वाज स्वत:ला सनातन योद्धा म्हणवून घेतो. राजकीय संरक्षण असल्यानं तुरुंगात गेलो नाही, असंही त्यानं सांगितलं आहे. स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून ताब्यात घेतलं आहे. भारद्वाज यानं व्हिडिओत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यावरुन कोणती कलम लागू शकतात आणि किती वर्षांची शिक्षा होऊ शकते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कलम 109-हत्येचा प्रयत्न
सर्वात गंभीर कलमांपैकी एक म्हणजे भारतीय न्याय संहितेचं कलम 109 आहे. हे कलम हत्येच्या प्रयत्नासंदर्भात आहे. हे कलम लागू करण्यासाठी पोलिसांना घटनेच्या मागील उद्देश किंवा माहिती सिद्ध करावी लागेल. हल्ला जिवे मारण्याच्या इराद्यानं केला गेला होता हे सिद्ध झालं किंवा जोरात वार केल्यानं जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास हे कलम लागू होतं. या कलमानुसार 10 वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यास कायद्यानुसार जन्मठेप होऊ शकते. न्यायालय हल्लेखोराच्या स्थितीचा आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करुन निर्णय देऊ शकते.
कलम 117 (2)- धोकादायक शस्त्रानं गंभीर इजा पोहोचवणे
भारतीय न्याय संहितेचं कलम 117 (2) धोकादायक शस्त्रानं किंवा जाणीवपूर्वक गंभीर इजा पोहोचवण्यांदर्भात आहे. लोखंडी कड्यानं मारल्याचं स्वतंत्र भारद्वाज यानं सांगितलं आहे. त्यानुसार गंभीर दुखापत केल्याचं स्पष्ट झाल्यानं हे कलम देखील लावलं जाऊ शकतं. या कलमानुसार 10 वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा असेल.
कलम 191 (2)- वाद निर्माण करणे
स्वतंत्र भारद्वाज यांनी संजयकुमार आझाद यांना मारहाण जंतरमंतर वर आंदोलनावेळी केली होती. यामुळं वाद किंवा दंगल निर्माण करणे यासंदर्भात कलमांचा देखील विचार केला जाऊ शकतो. भारतीय न्याय संहितेच्या कलम 191(2) चा वापर देखील केला जाऊ शकतो, यात 2 वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. दंगल किंवा वाद निर्माण करण्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडे शस्त्र असतील तर त्याच्यावर कलम 191 (3) लावलं जाऊ शकते. यामध्ये 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
कलम 115(2): दुखापत किरकोळ असल्यास
हल्ल्यातील पीडित किंवा जखमी व्यक्तीला झालेली दुखापत वैद्यकीय आकलनावर अवलंबून असेल. जर वैद्यकीय रिपोर्टमध्ये आणि त्यानंतर कायदेशीर बाबींनुसार गंभीर दुखापतीऐवजी किरकोळ दुखापत मानलं गेल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2) चा वापर होऊ शकतो. या कलमानुसार 1 वर्षापर्यंत कारावास आणि 10 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.























