नवी दिल्ली : अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास या प्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे.


मे 2017 मध्ये 11 ते 18 तारखेदरम्यान सलग 7 दिवस सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या समोर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 18 मे रोजीच निर्णय घेतला आहे. मात्र, तो निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला तिहेरी तलाकवरील निर्णय आज सकाळी 10.30 वाजता जनतेसमोर येईल. भारतातील एकंदरीत राजकारणाला वेगळं वळण देणारा असा हा निर्णय असल्याने महत्त्व अधिक वाढलं आहे.

महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा हा निर्णय असल्याने मुस्लीम समाजातील महिलांसह अवघ्या देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलं आहे.

तिहेरी तलाक पद्धतीला वैध मानत नाही. ही परंपरा सुरु राहावी, असे वाटत नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट केली होती. तर तलाकवर बंदी म्हणजे धर्मावर अतिक्रमण आहे. त्यामुळे धर्मावर अतिक्रमण करु नये, अशा आशयाची याचिका मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने केली होती.