नवी दिल्ली : आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी सुरु असलेल्या वृक्षतोड प्रकरणी आज (7 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली असून यावर आज सुनावणी होणार आहे.

आरे वृक्षतोड प्रकरणी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयात याबाबत आज सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष पीठाची स्थापना करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश आज दिल्लीत नसल्यामुळे उद्या विद्यार्थ्यांचं पत्र त्यांच्यासमोर ठेवल जाईल. विद्यार्थ्यांच्या या पत्रात वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचीही माहिती देण्यात आली आहे.



कारशेडसाठीच्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे 'आरे कॉलनी हे जंगल नाही' यावर उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत, कारशेडसाठीची वृक्षतोडीला दिलेली परवानगी वैध ठरवली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने निकाल शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानंतर वृक्षतोड थांबावी यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर 38 जणांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांना शनिवारी जामीन मंजूर केला.

एमएमआरडीएमार्फत मेट्रो 3 साठी कारशेड बांधण्यात येणार असून त्यासाठी आरेतील 2646 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या वृक्षतोडीला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

मात्र याचिकाकर्त्यांनी एकाच विषयात भारंभार याचिका आणि सगळीकडे अपील करुन घालून ठेवलेला घोळ हा त्यांच्याच विरोधात गेला. तसेच आपली बाजू कायदेशीर पद्धतीने कोर्टापुढे मांडण्यातही ते अपयशी ठरले असं निरीक्षणही कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.