महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचार करणार नाहीत, परदेशी रवाना : सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2019 02:02 PM (IST)
राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे.
Getty Images)
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. वायनाड या मतदारसंघापुरतंच ते स्वत:ला सीमित ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकससभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मात्र दुसरीकडे राहुल गांधी नाराज असल्याचे देखील समजते. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे. राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळते आहे. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याची माहिती होती. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करणार होते, मात्र ते तिथंही आले नव्हते. दरम्यान, राहुल गांधी बँकॉकला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बँकॉक हा शब्द ट्रेंड करत आहेत. यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. यातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पक्षाने या दोन्ही राज्यातील प्रचाराच्या यादीत राहुल गांधी यांचा समावेश स्टार प्रचारक म्हणून केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर निकाल 24 तारखेला जाहीर होणार आहे.