श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला समोर आले आहेत. प्रशासनाच्या परवानगीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे 15 नेते फारुख अब्दुल्ला यांच्या घरी पोहोचले होते. फारुख अब्दुल्ला यांनी सर्व नेत्यांशी काही वेळ चर्चा केली.

Continues below advertisement

फारुख अब्दुल्ला गेल्या दोन महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या 15 नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. या भेटीसाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची परवानगी घेतली होती.

फारुख अब्दुल्ला यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे, तर ओमर अब्दुल्ला यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी राज्यातील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. दोन महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे.