नवी दिल्ली  : ‘आम्ही ताजमहाल बंद करतो किंवा तुम्ही त्याला नीट सुरक्षा द्या नाहीतर तो पाडून टाका’, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ताजमहालच्या सुरक्षेवरुन केंद्र सरकारला फटकारलं आहे.

‘आपला ताजमहाल हा आयफेल टॉवरपेक्षाही सुंदर आहे आणि देशाच्या परकीय चलनाचा प्रश्न सोडवू शकणारी ही वास्तू आहे. तुमच्या हलगर्जीपणामुळे देशाचं किती मोठं नुकसान होत आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे का,’ असा संतप्त सवालही यावेळी सुप्रीम कोर्टाने सरकारला केला.

ताजमहालच्या देखरेखीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी ताजमहालची सुरक्षा आणि संवर्धनाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर न केल्याने उत्तरप्रदेश सरकारलाही कोर्टाने खडेबोल सुनावले.

खराब हवामानामुळे ताजमहालचा रंग बदलत आहे, असं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यानंतर या परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे.

मुघल राजा शाहजहानने पत्नी मुमताजच्या निधनानंतर तिच्या आठवणींत आग्रा येथे ताजमहालची उभारणी केली होती. जगातील सात आश्चर्य़ांमध्ये भारतातील या ऐतिहासिक वास्तूचा समावेश होतो.

दरम्यान,अलिकडच्या काळात काही व्यक्तींनी ही वास्तू ताजमहाल नसून तेजोमहाल असल्याचा दावा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर ही वास्तू तेजोमहाल किंवा शिवमंदिर नसून शहाजहानची पत्नी मुमताज हिची कबरच आहे, असं पुरातत्व खात्याने सुप्रीम कोर्टात म्हटलं होतं.