नवी दिल्ली: राजस्थानातील जैसलमेरच्या रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहणारे अनेक प्रवासी दिसत आहेत. ते प्रवासी आहेत पाकिस्तानातून आलेले हिंदू नागरिक.

पाकिस्तानी हिंदू हा शिक्का पुसायलाच ते भारतात आले होते. त्यांना इथे येऊन फक्त हिंदू म्हणून जगायचं होतं. पण आता ते परत निघाले आहे. कारण भारतानं त्यांची निराशा केली आहे. पाकिस्तानात परत जाण्याशिवाय त्यांच्यासमोर आता पर्याय उरलेला नाही. गेल्या तीन वर्षात तब्बल 2000 पाकिस्तानी हिंदू अशाच पद्धतीनं माघारी फिरले आहेत.

सरकारी बाबूंकडून निराशा

पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. या अल्पंसख्यांकांवर होणारे सततचे अत्याचार, धर्मांतराचे प्रयत्न या सगळ्याला कंटाळून ते भारतात दाखल झाले. इथे आल्यावर आपलं आयुष्य बदलेल अशी आशा त्यांना होती. पण इथल्या सरकारी व्यवस्थेनं त्यांचीही निराशा केली आहे.

पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल अशी घोषणा आपल्या सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती. त्यासंदर्भातले अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. भारतात आल्यानंतर आपले भोग संपतील या आशेनं अनेकांनी पाकिस्तान सोडलं. पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम जमिनीवर दिसला नाही. कारण हे नियम-कायदे इतके कडक होते की सरकारी कागदपत्रं जमा करता करताच त्यांना नकोसं झालं. त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं, त्यांची अगतिकता समजून घेण्याची संवेदनशीलता सरकारी व्यवस्थेला दाखवता आली नाही.  

कागदी घोडे

राजस्थान सीमेवरच्या अनेक खेड्यापाड्यांत काही दशकांपासून हे पाकिस्तानी विस्थापित हिंदू राहत आहेत. आपण काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी मध्येच कधीतरी सरकारी व्यवस्थेचा अजगर हलल्यासारखं करतो. इथे रिफ्य़ूजी कॅम्प लागतो..पण त्यात केवळ कागदपत्रं नाचवली जातात..प्रत्यक्षात नागरिकत्व मात्र काही मिळतच नाही.

परतलेले पाकिस्तानी हिंदू

2015 ते 17 या दोन वर्षात भारतात आलेले 968 पाकिस्तानी हिंदू परत गेले

2017 मध्ये 44 लोक परत गेलेत तर 2018 मध्ये केवळ पहिल्या सहा महिन्यांतच 59 हिंदूंना परतीची वाट धरावी लागली आहे.

धार्मिक व्हिसावर हे लोक भारतात येतात. पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांना भारताचाच आधार वाटतो. पण इथे आल्यावर सरकारी सिस्टीम त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी करुन ठेवते.

विस्थापित कुठल्याही धर्माचे असले तरी त्यांचं दु:ख मानवतेच्याच नजरेतून पाहायला हवं. पण तिही संवेदनशीलता यांच्याबाबतीत दिसली नाही. बांगलादेशी निर्वासितांचे किती लोंढे भारतात येतात, बिनदिक्कत या व्यवस्थेच्या पोटात शिरतात त्याची गणती नाही. पण जे लोक नियमानुसार या देशाचा भाग होऊ पाहत आहेत त्यांच्या नशिबी मात्र हे असं अधांतरी जगणं.

हिंदुत्वाचा डंका पिटत जे लोक सत्तेवर येतात त्यांनाही हे दु:ख कळू नये हे विशेष. सरकार बदलत गेली तरी यांना कुणी वाली उरलेला नाही. हिंदू केवळ मतांपुरता हेच त्यातून अधोरेखित होत आहे.