नवी दिल्ली: BS-III इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढे BS-III इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्रीच बंद करण्याचा निर्णय कोर्टाने दिला.

पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे BS-III  इंजिन असलेल्या तब्बल 8 लाख 14 हजार गाड्यांच्या विक्रीवर संक्रात आली आहे.

या निर्णयामुळे भारतात आता केवळ BS IV इंजिन असलेल्या गाड्यांच्याच खरेदी-विक्रीला परवानगी असेल.

लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. 1 एप्रिलपासून BS IV  इंजिन असलेल्या गाड्यांच्या विक्रीलाच परवानगी मिळेल, हे वाहन निर्मिती कंपन्यांना माहित होतं. त्यामुळे आता या निर्णयावर आक्षेप घेऊ शकणार नाहीत. गाड्यांपेक्षा लोकांच्या आरोग्याची काळजी आहे, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालादरम्यान सांगितलं.

देशभरात सध्या BS-III इंजिन असलेल्या गाड्यांचा भला मोठा स्टॉक आहे. यामध्ये

  • दुचाकी - 6 लाख 71 हजार 308

  • तीन चाकी - 40 हजार 048

  • कार - 16 हजार 198

  • व्यावसायिक वाहने ट्रक/अवजड वाहने - 96 हजार 724 समावेश आहे.


ज्या गाड्यांचं इंजिन BS-IV नाही, त्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि नोंदणी होणार नाही, असं न्यायमूर्ती मदन लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने कालच या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता.

भारतीय ऑटोमोबाईल निर्मिती संस्थेने (SIAM) काल BS-III इंजिन असलेल्या वाहनांची संख्या आणि त्यांचा साठा किती याबाबतची माहिती कोर्टाला दिली होती. SIAM च्या माहितीनुसार देशभरात 8.24 लाख इतका मोठा साठा BS-III इंजिन असलेल्या गाड्यांचा आहे.

BS-III  आणि BS IV इंजिन म्हणजे काय?

  • BS म्हणजे भारत स्टॅण्डर्ड स्टेज. इंजिनाच्या अंतर्गत वहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी, केंद्र सरकारने दिलेलं मानक म्हणजे BS होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवतं.

  • BS मानकं ही भारतात धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी लागू आहेत.

  • भारतात जसं BS मानकं आहेत, तशी युरापोत Euro, अमेरिकेत Tier 1, Tier 2 अशी मानकं आहेत.

  • वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी BS मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. BS IV हा त्याचाच भाग असून, कमीत कमी वायू प्रदूषणाच्या दृष्टीने आता भारतात वाहनांमध्ये BS IV इंजिन बंधनकारक आहे.