नवी दिल्ली : गुजरातमधील 2002 च्या दंगलीतील पीडित तरुणी बिल्कीस बानो यांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला दिले आहेत. याशिवाय बिल्कीस बानो यांना नियमानुसार घर आणि शासकीय नोकरी देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.


याप्रकरणात पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आयपीएस अधिकारी आर. एस. भगोरा यांचं 2 पोस्ट पदावनती करण्याची राज्य सरकारची शिफारस देखील मान्य करण्यात आली आहे. भगोरा 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहितीही गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात दिली.


सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बिल्कीस बानो यांच्या जास्तीच्या नुकसान भरपाई बाबतच्या मागणीवर सुनावणी केली. याआधी बिल्कीस बानो यांनी गुजरात सरकारची 5 लाखांची मदत स्वीकारण्यास खंडपीठासमोरच नकार दिला होता.


काय आहे प्रकरण?


गुजरातमधील अहमदाबादजवळील रणधीकपूर गावात दंगली दरम्यान 3 मार्च 2002 रोजी एका गटाने बिल्कीस बानोच्या घरावर हल्ला केला होता. त्यावेळी बिल्कीस बानो पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्या अवस्थेत हल्लेखोरांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी विशेष न्यायालयाने जानेवारी 2008 मध्ये 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.