मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचं हे नवं क्षेत्र कोणतं, याचं उत्तर मिळालं आहे. बॉलिवूडच्या खिलाडीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.

अक्षय कुमारने घेतलेली नरेंद्र मोदींची मुलाखत उद्या सकाळी प्रक्षेपित केली जाणार आहे. खुद्द अक्षयने याबाबत ट्विटरवरुन माहिती देत प्रोमो शेअर केले आहेत. ही मुलाखत अराजकीय असल्याचं अक्षयने म्हटलं आहे.

अक्षयने पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर अक्षयच्या काही प्रश्नांवर मोदी खळखळून हसतानाही पाहायला मिळत आहेत. मुलाखतकाराच्या भूमिकेतील खिलाडीने राजकारणातील बड्या खिलाडीची घेतलेली मुलाखत तुम्ही 'एबीपी माझा'वर उद्या (बुधवार 24 एप्रिल) सकाळी नऊ वाजता पाहू शकाल.


अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. "आज मी जे करणार आहे, ते यापूर्वी कधीही केलेली नाही. मी याबाबत अतिशय उत्साही आणि अधीर आहे. पुढची माहिती लवकरच..." या ट्वीटनंतरच अक्षय कुमार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

अक्षयने आणखी एक ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं. "मी याआधी केलेल्या  ट्वीटमुळे तुम्हा सगळ्यांची उत्सुकता ताणली गेल्याचं पाहून आनंद वाटला, पण मी निवडणूक लढवत नाही, हे इथे स्पष्ट करु इच्छितो" असं अक्षयने म्हटलं.