नवी दिल्ली : चंद्र-ताऱ्यांच्या हिरव्या झेंड्यावर बंदीच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्ट या मुद्द्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी करणार आहे. यूपी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी या झेंड्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
सय्यद वसीम रिझवी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे वरिष्ठ वकील एस पी सिंह म्हणाले की, "या झेंड्यावरुन देशभरात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण होत असते." "या मुद्द्यावर सरकारशी सल्लामसलत करा," असे निर्देश न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुप्रीम कोर्टात उपस्थित महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले आहे.
"अनेक वेळा सरकारला एखाद्या मुद्द्यावर पावलं उचलणं कठीण असतं. द्वेषाने हा निर्णय घेतल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण होईल, याची भीती सरकारला असते. आता हे प्रकरण कोर्टात आहे. जर तुम्हाला या मुद्द्यावर काही बोलायचं असेल तर बोलू शकता," अशी टिप्पणी न्यायमूर्ती सिकरी यांनी केली.
झेंड्याचा इस्लामशी संबंध नाही
रिझवी यांच्या याचिकेनुसार, "या झेंड्याचा इस्लामशी कोणताही संबंध नाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर जेव्हा मक्काला गेले होते, तेव्हा त्यांच्या हातात पांढरा झेंडा होता. मध्य युगातही इस्लामिक सैन्याचे विविध झेंडे होते. चंद्र-ताऱ्यांचे हिरव्या झेंड्याचं 1906 पूर्वी कोणतंही अस्तित्त्व नव्हतं."
जिना यांच्या मुस्लीम लीगचा झेंडा
"नवाज वकार उल-मलिक आणि मोहम्मद अली जिना यांनी स्थापन केलेल्या मुस्लीम लीगचा झेंडा म्हणून 1906 मध्ये ढाक्यात याचं डिझाईन तयार करण्यात आलं होतं. फाळणीनंतर पाकिस्तानने यात किरकोळ बदल करुन तो राष्ट्रीय ध्वज बनवला. आताही पाकिस्तान मुस्लीम लीग कायदे-आज़म नावाचा पक्ष याच झेंड्याचा वापर करतो," असं याचिकेत म्हटलं आहे.
झेंडा लावणाऱ्यांवर कारवाई करा
रिझवी यांच्यानुसार, "कट्टर आणि पाकिस्तानविरोधी लोकांनी अफवा पसरवली आहे की, हा इस्लामिक झेंडा आहे. बहुतांश लोकांना सत्य माहित नसतं. काही स्वार्थी लोक अनेकांच्या घरावर हा झेंडा लावून जातात. हा धार्मिक झेंडा समजून तो तसाच राहू देतात. मुस्लीम वस्त्यांमध्येही हे लोक चंद्र-ताऱ्यांचा झेंडा लावला जातो."
धार्मिक तणावाचं मोठं कारण
"मुस्लीम वस्त्या-परिसरात अज्ञात लोक हा झेंडा लावतात आणि हिंदू लोक हा पाकिस्तानचा झेंडा समजतात. परिणामी हा झेंडा धार्मिक तणावाचा कारण बनतो. तो फडकावल्याने गैरसमज आणि तणाव निर्माण होतो," असं याचिकेत म्हटलं आहे.
चंद्र-ताऱ्यांच्या हिरव्या झेंड्यावर बंदी? सरकारला बाजू मांडण्याचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 01:50 PM (IST)
या झेंड्याचा इस्लामशी कोणताही संबंध नाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर जेव्हा मक्काला गेले होते, तेव्हा त्यांच्या हातात पांढरा झेंडा होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -