नवी दिल्ली : 24 व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी देऊन डोंबिवलीच्या गर्भवतीला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. गर्भामुळे महिलेच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला.


मुंबईजवळच्या डोंबिवलीत राहणाऱ्या 22 वर्षीय महिलेचा गर्भ अविकसित असल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं. त्यामुळे तज्ज्ञांच्या समितीने महिलेला गर्भपात करण्याचा सल्ला दिला.

सुप्रीम कोर्टाने मुंबईच्या परळमधील केईएम रुग्णालयाला गर्भवतीची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं आहे. 21 व्या आठवड्यात तिच्या गर्भातील व्यंग लक्षात आलं होतं. गर्भपातसंबंधी कायद्यानुसार गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यानंतर गर्भपात करणं अवैध आहे. त्यामुळे महिलेने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

सुप्रीम कोर्टात गेलेली ही गेल्या तीन वर्षातील शहरामधील चौथी घटना आहे. गर्भाच्या कवटीचा विकास अपरिपक्व असल्याचं डॉक्टरांच्या अहवालात समोर आलं. त्यानंतर गर्भपातासाठी तिने पतीसह अनेक गायनॅकचे उंबरे झिजवले. मात्र 20 व्या आठवड्यानंतर गर्भपात अवैध असल्याने अनेक डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर महिलेने कोर्टात धाव घेतली होती.