नवी दिल्ली : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापल्यानं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्टीकरण मागवलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामुळे नाराज असल्याचं पीएमओ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
पीएमओतील अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पंतप्रधानांचीही नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला याप्रकरणी उत्तर देण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधीऐवजी मोदींचा फोटो लावल्याने राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांनी टीका केली होती. यापूर्वी जिओ, पेटीएम यांच्या जाहिरातीतही पंतप्रधानांचा फोटो विनासंमती वापरल्याचं पीएमओ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या डायरीवर महात्मा गांधी यांचा चरख्यावर सूत काततानाचा फोटो छापला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींची ही प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनावर ठसली आहे. मात्र इतिहासात पाच वेळा गांधीजींऐवजी सामान्य नागरिकांचे फोटो वापरले गेले आहेत, असं आयोगातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधानांनी महिलांना पाचशे चरख्यांचं वाटप केलं होतं. मोदी हे खादी समर्थक असून लोकप्रिय चेहरा असल्याने त्यांचा फोटो छापल्याचं दबक्या आवाजात म्हटलं जात आहे.