मुंबई : आज बुद्ध जयंती. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्‍त झाले. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रुपाने साजरी होते. भगवान बुद्धांनी जगाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्यांनी लोकांच्या दु:खांची कारणं सांगून त्या दु:खांचं निवारण देखील सांगितलं. बिहारच्या बोधगयामध्ये बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच कुशीनगरमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. भगवान बुद्धांना भगवान विष्णूचा नववा अवतार देखील मानलं जातं.


यामुळं साजरी होते बुद्ध पौर्णिमा
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.



आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला.

जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली. दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.

बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, हे स्पष्ट करणारी काहीएक कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारण परंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे. म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वत: गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता.

माहिती स्त्रोत- विकिपीडिया