नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा गुंता चार वर्षांनंतरही सुटलेला नाही. त्यातच सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी थरुर यांचं नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलं आहे.

शशी थरुर यांनी पत्नीशी क्रूर वर्तन केल्याचा आरोपही दिल्ली हायकोर्टात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत, मात्र त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्या काहीही खात नव्हत्या, रुमबाहेर पडत नव्हत्या, असं समोर आल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे.

तीन हजार पानांच्या आरोपपत्रात केवळ थरुर यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला आहे. आपल्यावरील आरोप विसंगत आणि हास्यास्पद असल्याचा दावा शशी थरुर यांनी ट्विटरवर केला आहे. ही चार्जशीट राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.




सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं 'एम्स' रुग्णालयाने म्हटल्यानंतर जानेवारी 2015 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचं मृत्यूच्या दिवशीच उघड?

'हॉटेल लीलामधील घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर सुनंदा यांनी आत्महत्या केली नाही, हे स्पष्ट आहे. प्राथमिक ऑटोप्सी रिपोर्टनुसार सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला' असं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक आणि गुप्त तपास अहवालात नमूद केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र सुनंदा यांनी आत्महत्या केल्याचं आता पोलिसांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सुनंदा पु्ष्कर 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या 345 क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता.