नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मोदींची भाषा धमकीवजा असल्याचं मनमोहन सिंह यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महागात पडेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला उद्देशून म्हटलं होतं. या विधानावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. पंतप्रधान काँग्रेसला धमकावण्याचं काम करत आहे, असं पत्रात स्पष्ट लिहिलं आहे.

राष्ट्रपतींना लिहिलेल्या काँग्रेसच्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या हुबळीतील भाषणावर आक्षेप नोंदवला आहे. देशाच्या पंतप्रधानांना पदाचा मान राखावा, त्यांनी कोणाविरोधातही अशा भाषेचा वापर करु नये, असं म्हटलं आहे. या पत्रात मनमोहन सिंह यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्याही स्वाक्षरी आहेत.


काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचारात 6 मे रोजी हुबळीमध्ये पंतप्रधान मोदींचं भाषण झालं होतं. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांच्यावर काँग्रेसने आरोप केल्यानंतर मोदींनी पलटवार केला होता. यावेळी मोदींनी काँग्रेसला नॅशलन हेराल्ड प्रकरणाची आठवण करुन दिली होती. "असा पक्ष, ज्याचा प्रमुख जामीनावर बाहेर आहे, ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनो, लक्ष देऊन ऐका, जर मर्यादा पार केली तर हा मोदी आहे, महागात पडेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

"पंतप्रधानपदासाठी घेतल्या जाणाऱ्या शपथेचा उल्लेख करताना, आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने पदाची मर्यादा ओलांडली नाही. आपल्यासारख्या लोकशाही असलेल्या देशात पंतप्रधानपदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारच्या धमकीवजा भाषेचा वापर केलेला नाही," असंही पत्रात म्हटलं आहे.

पत्रात कोणाकोणाच्या स्वाक्षरी?
पीएम मोदींविरोधात राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही स्वाक्षरी केली आहे. या नेत्यांमध्ये पी. चिदंबरम, अशोक गहलोत, दिग्विजय सिंह, कमलनाथ, मुकुल वासनिक, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी, आनंद शर्मा, एके अँटनी आणि अहमद पटेल यांचा समावेश आहे.