भोपाळ : लोकसभा निवडणूक लढवण्यापासून वंचित राहिलेल्या माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. सुमित्रा महाजन यांच्याकडे एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रं सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. महाजन या महाराष्ट्राच्या राज्यपाल होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहेत.

विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी सुमित्रा महाजन यांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना भाजप कार्यकर्ते आणि काही स्थानिक नेत्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत आहे.

भाजपने इंदूरमधील उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्यामुळे महाजन खंतावल्या होत्या. अखेर, पक्षाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुमित्रा महाजनांनी आपली नाराजी उघड केली होती. तुम्हाला मला उमेदवारी न देण्यास संकोच वाटत असेल, तर मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेते, असं म्हणत त्यांनी तलवार म्यान केली होती. इंदूरमधून शंकर लालवानी भाजपच्या तिकीटावर निवडून आले.



सुमित्रा महाजन या 'ताई' म्हणून राजकीय वर्तुळात सुपरिचित आहेत. महाराष्ट्रातील चिपळूण ही त्यांची जन्मभूमी, तर इंदूर ही कर्मभूमी. 1989 पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून सुमित्रा महाजन तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्या 16 व्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या नव्या राज्यपालांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणकन्या सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.