नवी दिल्ली / नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचवी रांग दिल्यामुळे अवमान झाल्याची बातमी समोर आली आणि महाराष्ट्रामध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटला. मात्र आता पवारांचा अवमान  नसून गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण खुद्द राष्ट्रपती भवनातून देण्यात आलं आहे.


पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना देण्यात आलेली जागा ही पहिल्याच रांगेतील होती, असं प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी सांगितलं आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधीच्या वेळची बैठक व्यवस्थेची दृश्यं आठवली, तर सर्व प्रमुख नेते पहिल्या रांगेत बसले होते.



त्या रांगेशेजारी असलेल्या बोर्डवर 'व्ही' हे अक्षर छापण्यात आलं होतं. त्यामुळे व्ही हे अक्षर रोमन लिपीतील पाचव्या रांगेचं निदर्शक नव्हतं. तर व्हीआयपीसाठी वापरण्यात आलेला तो कोड होता. पवारांना देण्यात आलेल्या पासवरही 'व्ही' हे अक्षर छापण्यात आलं होतं. त्याचा अर्थ पाचवी रांग असा लावला गेला. प्रत्यक्षात 'व्ही' म्हणजे 'व्हीआयपी' असल्याचा दावा केला जात आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अवमान?



शरद पवारांच्या पासवर छापलेला क्रमांक हा आसन क्रमांक नसून तो तिकिटांचा अनुक्रमांक असल्याचा दावा होत आहे. खरं तर त्या दिवशी फर्स्ट कम फस्ट सर्व अशी बैठक व्यवस्था होती. त्यामुळे पवारांचा अवमान होण्याचा प्रश्नच नव्हता, अशी भूमिका आयोजकांची आहे. केवळ पासवरच्या संदेशाचा अर्थ लावण्यात गल्लत झाली आणि सुरु झालं मानापमान नाट्य.

30 मे रोजी नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन अशा 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली.