Sukhvinder Singh Sukhu Takes Oath: काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याशइवाय मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी दुपारी शिमलामधील रिज मैदानात दुपारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Himachal Pradesh Governor Rajendra Vishwanath Arlekar) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 
हिमाचल प्रदेशमध्ये पाच वर्षानंतर सत्तांतर झालं. भाजपला सत्ता राखण्यात अपयश आलं. काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली. आज झालेल्या शपथग्रहण समारंभाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, हिमाचल प्रदेशचे सर्व आमदार,  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आणि हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. 







कोण आहेत सुखविंदर सिंह सुक्खू ? 


58 वर्षीय सुखविंदर सिंह सुक्खू हे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. सुक्खू यांनी सहा वर्ष हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. सुक्खू यांचा जन्म 27 मार्च 1964 रोजी हिमाचल प्रदेशातील नादौन येथे झाला.  हिमाचल प्रदेशातील नादौन विधानसभा मतदारसंघातून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपच्या विजय कुमार यांचा 3,363 मतांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुक्खू हे आघाडीवर होते. सुखविंदर सिंह यांना 50.88 टक्क्यांसह 36142 मते मिळवली तर भाजपच्या विजय कुमार यांना 46.14 टक्क्यांसह 32,779 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार शांकी ठुकराल यांना केवळ 1,487 मते मिळाली. 


चार वेळा राहिलेत आमदार  
58 वर्षीय सुखविंदर सिंह सुखू  हिमाचलमध्ये विक्रमी चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2003 मध्ये नादौन विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007, 2017 आणि आता 2022 मध्येही ते नादौनमधून आमदार झाले. सुखविंदर सिंग सुखू यांचं लग्न 11 जून 1998 रोजी कमलेश ठाकूर यांच्याशी झालं. त्या गृहिणी आहेत. त्यांना दोन मुली असून दोघीही दिल्ली विद्यापीठात शिकतात.