औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाडीवाट जिल्हा परिषद येथील शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जापनीज भाषा शिकत आहेत. अशा प्रकारे विदेशी भाषा शिकवणारी ही महाराष्ट्रातली पहिली सरकारी शाळा आहे. आता या शाळेची दखल पंतप्रधान मोदी यांनी देखील घेतली आहे. 'मन की बात अपडेट्स' या ट्वीटर हँडलवरुन या शाळेबद्दल ट्वीट करण्यात आले आहे. एबीपी माझाने या शाळेची पहिल्यांदा बातमी केली होती. जपानी भाषा शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचं आता 'मन की बात'मध्ये कौतुक होणार आहे.
काय आहे ट्वीट?
औरंगाबाद पासून 25 कि. मी. दूर असलेल्या गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून जपानी भाषा शिकत आहेत. आणि बोलतात देखील चांगले. पंतप्रधान मोदी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमात या शाळेचं, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक करणार आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत जगाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मुलांच्या शिक्षणाची देखील मोठी गैरसोय होत असताना दिसतेय. अशात औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका झेडपी शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र कमाल केली आहे. औरंगाबादपासून 25 कि.मी. दूर असलेल्या गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शासनाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमा सोबतच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जापनीज भाषा शिकत आहेत. तसेच विषय मित्र व पालक मित्रांच्या मदतीने भौगोलिक क्षेत्रानुसार केलेल्या गटातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी गाडीवाट तांडा येथील जापनीज भाषा शिकत असलेल्या गटास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी शाळेस केलेल्या मदतीचे कौतुक केले.
पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील विद्यार्थ्यांनी आव्हान स्वीकारून आपला वर्षभराचा अभ्यासक्रम शाळा बंद असतानाही 3 महिन्यात पूर्ण केला. आता पुढील काळात हे विद्यार्थी जर्मनी भाषेसोबतच अभ्यासक्रमाबाहेरील इतर अनेक गोष्टी शिकणार आहेत. वरवंडी तांडा येथील चार ग्रामस्थांनी आपली स्वतःची जमीन शाळेसाठी दान दिली. गावाच्या नावात जरी गाडीवाट असलं तरी या मुलांनी निवडलेला मार्ग त्यांना निश्चितच त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल यात काही शंका नाही. दोन्ही शाळांना प्रशासन व शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळत राहील याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.
Flood Management Tech | मुंबईच्या तुंबईवर जपानी तंत्रतज्ञान कामी येईल? | ABP Majha