AK-203 Assault Rifle: भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे. याच कारण म्हणजे आता AK-203 असॉल्ट रायफलची  (AK-203 Assault Rifle) निर्मिती भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाच्या सहकार्याने ही रायफल भारतात तयार केली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमेठी जिल्ह्यात असलेल्या कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये या असॉल्ट रायफलची निर्मिती केली जाईल. AK-203 असॉल्ट रायफलचे उत्पादन 2022 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.


उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरी येथे रशियन असॉल्ट रायफलच्या निर्मितीसाठी भारत-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना रशियन अधिकारी अलेक्झांडर मिखीव यांनी सांगितले की, "कोर्वा ऑर्डनन्स फॅक्टरी 2022 च्या अखेरीस कलाश्निकोव्ह AK-203 असॉल्ट रायफलचे उत्पादन सुरू करण्यास तयार आहे," 


मिखीव यांनी सांगितलं की, त्यांच्या योजनांमध्ये ही प्रसिद्ध रशियन असॉल्ट रायफलचे उतपादन 100 टक्के भारतात करण्याचं उद्धिष्ट समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त संयुक्त उपक्रम भविष्यात उत्पादन कार्ये वाढवू शकतो आणि कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल प्लॅटफॉर्मवर आधारित ऍडव्हन्स रायफल तयार करण्यासाठी सुविधांचे आधुनिकीकरण करू शकतो.


काय आहे AK-203 रायफल?


भारतीय सैन्य दीर्घकाळापासून इन्सास रायफल वापरत आहे. भारतीय सैन्याला अत्याधुनिक AK-203 असॉल्ट रायफल मिळाल्यानंतर त्यांची ताकद नक्कीच वाढेल. AK-203 ही INSAS रायफलपेक्षा हलकी आणि अधिक प्राणघातक असेल. AK-203 असॉल्ट रायफल्सचे वजन 3.8 किलो आहे आणि याची लांबी 705 मिमी आहे. तर INSAS रायफलचे वजन सुमारे 4.15 किलो असून याची लांबी 960 मिमी आहे. कमी वजन आणि कमी लांबीमुळे AK-203 असॉल्ट रायफल्स हाताळण्यास सोपे जाईल. ही रायफल दीर्घकाळ वापरली जाऊ शकते. कमी झालेल्या वजनामुळे सैनिकांचा थकवा कमी होईल आणि त्यांना ऑपरेट करणेही सोपे जाईल. AK-203 असॉल्ट रायफलमध्ये 7.62x39mm च्या बुलेट आहेत आणि याची रेंज देखील 800 मीटर आहे.


दरम्यान, उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये पुढील दहा वर्षांसाठी 6.01 लाख AK-203 असॉल्ट रायफल तयार करण्याची योजना आहे. याआधी सुमारे 70 हजार ते 1 लाख एके-230 रायफल्स आणि त्याचे तंत्रज्ञान रशियातून भारतात आणले जाणार आहे. यूपीमध्ये असलेल्या कारखान्यात रायफल बनवण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल 32 महिन्यांनंतर सैन्याला ही रायफल मिळू शकणार आहे.